दही बनवण्याच्या भांड्यात उबवली सापाची अंडी! | पुढारी

दही बनवण्याच्या भांड्यात उबवली सापाची अंडी!

लंडन : सापांच्या अनेक प्रजाती बिनविषारी असतात व त्या शेतकर्‍यांसाठी सहायकही असतात. अशीच एक प्रजाती आहे ‘ग्रास स्नेक’. इंग्लंडमध्ये कॉर्नवॉलच्या एका कुटुंबाला कचर्‍याच्या ढिगार्‍यात अशा सापाची काही अंडी सापडली. त्यांनी ती घरी आणून दही बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ‘योगर्ट मेकर’ मध्ये ठेवून उबवली. ही अंडी फोडून बाहेर आलेल्या पिल्लांना पुन्हा एकदा त्याच ठिकाणी सोडण्यात आले जिथे ही अंडी आढळली होती!

लिस्कर्डजवळील ट्रेमर येथे टिम फ्यूज व त्यांचे कुटुंबीय राहतात. त्यांच्या घराच्या बागेजवळ सहा आठवड्यांपूर्वी एका कंपोस्ट ढिगावर सापाची दहा अंडी आढळून आली. या अंड्यांना वाचवण्यासाठी त्यांनी ही अंडी घरी आणून उबवण्याचे ठरवले. माती व पालापाचोळ्यासह ही अंडी त्यांनी घरातील योगर्ट मेकरच्या भांड्यात ठेवली. आपल्या मुलाच्या मदतीने त्यांनी या अंड्यांची काळजी घेतली. आतापर्यंत यापैकी चार अंडी फुटून पिल्ली बाहेर आली आहेत. अंड्यातून पिल्लू बाहेर येत असताना पाहणे हा एक अनोखा अनुभव होता असे टिम यांनी सांगितले. अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लांची लांबी एखाद्या पेन्सिलीइतकी होती. या पिल्लांना पुन्हा एकदा कंपोस्ट ढिगाजवळ सोडण्यात आले.

‘ग्रास स्नेक’ हे सहसा पाणथळ जागी आढळतात. त्यांना पाणसर्पही म्हटले जात असते. याचे कारण म्हणजे एखाद्या उभयचर प्राण्याप्रमाणे ते पाण्यात व जमिनीवर ये-जा करीत असतात. त्यांचा आहारही बेडकासारखे उभयचर प्राणीच असतात. या सापाची अद्याप सहा अंडी फुटलेली नाहीत. अ‍ॅम्फिबियन अँड रेप्टाईल कन्झर्व्हेशन ट्रस्ट वाईल्डलाईफ चॅरिटीचे तज्ज्ञ गॅरी पॉवेल यांनी या कुटुंबाच्या प्रामाणिक हेतू व प्रयत्नांबाबत त्यांचे कौतुक केले आहे. मात्र, लोकांनी असा प्रकार करू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. सापाची अंडी घरात आणून उबवणे हा काही सरळसोपा मार्ग नाही असे त्यांनी म्हटले आहे.

Back to top button