जेट सूट : आता लढताना हवेतही उडू शकतील सैनिक! | पुढारी

जेट सूट : आता लढताना हवेतही उडू शकतील सैनिक!

लंडन : पौराणिक चित्रपट किंवा मालिकांमध्ये युद्धावेळी हवेतूनही हल्‍ला करणारे वीर आपण पाहत असतो. आता असे वास्तवातही घडू शकते. याचे कारण म्हणजे आता सैनिकांसाठी खास जेट सूट विकसित करण्यात आले आहेत. ते परिधान करून सैनिक वास्तविक जीवनातील ‘आयर्न मॅन’ बनू शकतील. हवेत उसळी घेऊन मोठ्या उंचीवरूनही ते शत्रूवर हल्‍ला करू शकतील.

ब्रिटनमध्ये अशा प्रकारच्या जेट सूटची निर्मिती करण्यात आली आहे. ब्रिटिश उद्योजक आणि ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीजचे सीईओ रिचर्ड ब्राऊनिंग यांनी फार्नबरोमध्ये आर्मी पिपल कॉन्फरन्सवेळी या जेट सूटचे प्रदर्शन केले. त्याची अनेक खास वैशिष्ट्ये पाहून सैन्यातील वरिष्ठ अधिकारी व कमांडर खूश झाले. हा जेट सूट विशेषतः नौदलातील सैनिकांसाठी बनवण्यात आला आहे.

या जेट सूटमध्ये पाच गॅस टर्बाईन लावलेली आहेत. त्यांच्या मदतीने जेट सूट परिधान केलेला सैनिक 12 हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकतो. तसेच कोणत्याही युद्धक्षेत्रावर असा सैनिक ताशी 80 मैल या वेगाने पोहोचू शकतो. त्यामुळे पॅराट्रूपर्सच्या माध्यमातून शत्रूवर हल्‍ला करण्याची बाब आता इतिहासजमा होऊ शकते.

उड्डाणासाठी वापरल्या जाणार्‍या या मशिनला कंपनीने ‘वर्ल्ड फर्स्ट’ असे नाव दिले आहे. या मशिनच्या क्षमता कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आल्या. हा सूट परिधान करून ते काही अंतरावर उभ्या असलेल्या जीपच्या हूड आणि ट्रकच्या छतावरही उतरले. शिवाय प्रेक्षकांनी भरलेल्या बाल्कनीतही त्यांनी उडी घेतली!

Back to top button