दर 20 हजार वर्षांनी हिरवेगार होते सहारा वाळवंट? | पुढारी

दर 20 हजार वर्षांनी हिरवेगार होते सहारा वाळवंट?

लंडन : ‘जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट’ अशी सहारा वाळवंटाची ख्याती आहे. हे वाळवंट आफ्रिका खंडात असून ते तब्बल 92 लाख चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेले आहे. एका संशोधनात दावा करण्यात आला आहे की हे वाळवंट दर 20 हजार वर्षांनी आपले रूप बदलते. दर 20 हजार वर्षांनी हे ओसाड वाळवंट हिरवेगार बनते!

मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी म्हटले आहे की या मरुस्थलाचा मोठा भाग उत्तर आफ्रिकेमध्ये आहे. हा भाग नेहमीच ओसाड नसतो. तेथील दगडांवर असलेली चित्रे, उत्खननामधून आढळलेले पुरावे हे दर्शवतात की इथे एके काळी पाणी होते. या ठिकाणी मनुष्यवस्तीही होती तसेच झाडे व प्राण्यांच्या विविध प्रजातीही नांदत होत्या. ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संशोधकांनी या वाळवंटाचा 2 लाख 40 हजार वर्षांचा इतिहास समजून घेण्यासाठी पश्चिम आफ्रिकेच्या किनार्‍यावर जमा झालेल्या धूळ आणि मातीचे विश्लेषण केले. अभ्यासकांचे म्हणणे आहे की प्रत्येक 20 हजार वर्षांमध्ये सहारा मरुस्थल आणि उत्तर आफ्रिकेत आलटून पालटून पाणी आणि दुष्काळ राहिला आहे. हा क्रम लागोपाठ होत होता. पृथ्वी सूर्याच्या चारही बाजूने फिरत असते. वेगवेगळ्या वातावरणात सूर्याच्या किरणांचे वितरण प्रभावित होते. प्रत्येक 20 हजार वर्षांमध्ये पृथ्वी अधिक उन्हाकडून कमी उन्हाकडे जाते. उत्तर आफ्रिकेवर त्याचे परिणाम दिसून येतात.

Back to top button