लघुग्रह अनपेक्षितपणे पृथ्वीच्या तीन हजार किलोमीटरच्या वर्तुळात | पुढारी

लघुग्रह अनपेक्षितपणे पृथ्वीच्या तीन हजार किलोमीटरच्या वर्तुळात

वॉशिंग्टन : ‘निअर अर्थ ऑब्जेक्टस्’ म्हणजेच पृथ्वीच्या जवळ असलेल्या खगोलीय वस्तूंवर संशोधन सातत्याने लक्ष ठेवत असतात. अनेक लघुग्रह पृथ्वीजवळून पुढे जात असतात. त्यांचा पृथ्वीला किती धोका आहे हे आधीच तपासून पाहिले जात असते. मात्र, अलीकडे एक लघुग्रह अनपेक्षितपणे पृथ्वीच्या तीन हजार किलोमीटरच्या वर्तुळात आला आणि वैज्ञानिकांना त्याचा पत्ताही लागला नाही!

‘2021 यूए 1’ असे या लघुग्रहाचे नाव. हा पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणारा तिसरा लघुग्रह ठरला आहे. हा लघुग्रह रविवारी अंटार्क्टिकाच्या भागावरून पुढे गेला. अर्थात त्यावेळी तो पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापेक्षाही अधिक उंचीवर होता. मात्र, अनेक संचार उपग्रहांपेक्षाही कमी उंचीवरून तो गेल्याने त्याच्याकडे लक्ष वेधले गेले.

खगोलशास्त्रज्ञ टोनी डन यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की या लघुग्रहाचा व्यास केवळ दोन मीटर होता. त्यामुळे तो जरी पृथ्वीच्या वातावरणात आला असता तरी जळून नष्ट झाला असता. तो दिवसाच्या वेळी प्रखर सूर्यप्रकाशात पृथ्वीकडे वेगाने आल्याने त्याचा पत्ता लागला नाही.

पृथ्वीच्या इतिहासात आतापर्यंत दोन लघुग्रह अतिशय जवळ आले होते. त्यापैकी एक ‘2020 क्यूजी’ दक्षिण हिंदी महासागरावरून केवळ 1830 मैल उंचीवरून गेला होता. अर्थात त्याचा आकार अतिशय छोटा असल्याने त्याचा पृथ्वीला कोणताही धोका नव्हता. दुसरालघुग्रह ‘2020 व्हीटी 4’ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पृथ्वीजवळून गेला होता.

Back to top button