कर्करोगाच्या रुग्णांमध्ये कोरोनामुळे रक्ताच्या गुठळीचा वाढतो धोका | पुढारी

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये कोरोनामुळे रक्ताच्या गुठळीचा वाढतो धोका

वॉशिंग्टन : एका संशोधनानुसार कोरोना विषाणूच्या संक्रमणाने होणार्‍या ‘कोव्हिड-19’ मुळे हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये तसेच कर्करोगरोधक औषधे घेणार्‍या लोकांमध्ये रक्तवाहिन्यांशी संबंधित ‘थ्रोम्बोएम्बोलिजम’ (व्हीटीई) विकसित होण्याचा धोका वाढतो. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गंभीर स्वरूपातील गुठळ्या बनतात.

‘जेएएमए ऑन्कोलॉजी’ मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की सिस्टमिक अँटी-कॅन्सर उपचार घेणार्‍यांमध्ये ‘व्हीटीई’ची जोखीम हे उपचार न घेणार्‍यांच्या तुलनेत 33 टक्के अधिक असते. कॅलिफोर्निया, सिनसिनाटी, टेक्सास विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की औषधे धमन्यांशी संबंधित थ्रोम्बोम्बोलिजमच्या उच्च जोखीमेशी निगडित नव्हती.

हे निष्कर्ष कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ‘कोव्हिड-19’ संबंधित थ्रोम्बोएम्बोलिजमशी निगडित आजार आणि मृत्यूदर यांना रोखण्यासाठी जवळून निगराणी आणि व्यक्तिगत थ्रोम्बोप्रोफिलॅक्सिसच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकते. या संशोधनासाठी संपूर्ण अमेरिकेतील टीमने जगभरातील 4,988 कर्करोग रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले. त्यांच्यामध्ये मार्च 2020 ते डिसेंबर 2021 पर्यंत कोरोना संक्रमणाची पुष्टी झाली होती.

Back to top button