‘या’ सुंदर बेटावर राहतात केवळ 250 लोक | पुढारी

‘या’ सुंदर बेटावर राहतात केवळ 250 लोक

लंडन : जगभरात अनेक सुंदर बेटं पाहायला मिळतात. काही बेटांचे स्वतःचे असे वेगळे वैशिष्ट्यही असते. असेच एक सुंदर बेट आहे ज्याचे नाव आहे ‘ट्रिस्टन दा कुन्हा’. अत्यंत निसर्गरम्य अशा बेटावर 7 जुलै 2023 च्या डेटानुसार केवळ 244 लोक आहेत. 2016 च्या जनगणनेनुसार ‘ट्रिस्टन दा कुन्हा’ बेटावर 293 लोक राहत होते. हे ठिकाण असे आहे जिथे अनेक लोक सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी जातात.

समुद्राचे निळेशार पाणी, निळसर डोंगर आणि गवताचे ‘हिरवे हिरवेगार गालिचे’ असे द़ृश्य पाहून लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. काही बेटं सुंदर पण रहस्यमयही असतात. हे बेटही असेच आहे. जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले हे मनुष्यवस्ती असणारे बेट आहे. पोर्तुगालमधील काही अभ्यासकांनी या बेटाचा शोध सन 1506 मध्ये लावला होता. हे बेट दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनपासून सुमारे 2787 किलोमीटर दूर दक्षिण अटलांटिक महासागरात आहे. सन 1816 मध्ये काही ब्रिटिश सैनिक काही लोकांना घेऊन या बेटावर आले होते. त्यामध्ये लहान मुलं आणि महिलाही होत्या.

फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्टला सेंट हेलेनामध्ये रोखण्यासाठी ब्रिटिश सैनिक या बेटावर आले होते. ज्यावेळी स्थिती सुधारली त्यावेळी काही सैनिकांनी आणि काही लोकांनी या बेटाला आपले घर बनवले. 2018 मध्ये इथे 250 नागरिक होते. येथील लोक मासेमारीच्या माध्यमातून कमाई करतात. तसेच पर्यटनाच्या माध्यमातूनही कमाई होत असते. याठिकाणी एकही हॉटेल नाही. सरकारने इथे येणार्‍या लोकांसाठी ‘होम स्टे’ची व्यवस्था केली आहे. या बेटावर पोहोचण्यासाठी कोणतेही विमानतळ नाही. इथे केवळ नावेच्या माध्यमातूनच जाता येते. या बेटावर जाण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून सहा दिवसांचा प्रवास करावा लागतो.

Back to top button