वॉशिंग्टन : अमेरिकेत प्रथमच 'यलो-लेग्ड हॉर्नेट' म्हणजेच पिवळ्या पायांच्या गांधीलमाशीचा शोध घेण्यात आला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीस जॉर्जियामधील सवाना येथे एका माशीपालकाने अनोखा कीटक पाहिल्याचे सांगितले होते. त्यानंतर संबंधित कीटकाचा अभ्यास केल्यावर ही 'यलो-लेग्ड हॉर्नेट' असल्याचे आढळले. आतापर्यंत अशा प्रकारची गांधीलमाशी अमेरिकेत आढळली नव्हती.
जॉर्जिया डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर (जीडीए) ने याबाबतची माहिती दिली आहे. या प्रजातीच्या माशा आता अमेरिकेत आल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता ही माशी ज्या ठिकाणी सापडली तिथे या माश्यांची घरटी शोधण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
जॉर्जियामधील कृषी आयुक्त टायलर हार्पर यांनी सांगितले की, परागीकरण करणार्या राज्यातील स्थानिक कीटकांना या घुसखोरांपासून धोका निर्माण होऊ शकतो. त्याचा संपूर्ण कृषी व्यवसायावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. पिवळ्या पायांची गांधीलमाशी ही मूळची आग्नेय आशियातील आहे. तिला 'व्हेस्पा वेलुुटिना' असे वैज्ञानिक नाव आहे. ही सामूहिक जीवन जगणार्या प्रजातीमधील असून, त्यांचे घरटेही मोठे असते. अशा घरट्यामध्ये सरासरी 6 हजार कष्टकरी माश्या असतात. अशी अंडाकार घरटी सहसा झाडांमध्ये असतात.