‘त्याची’ कुत्रा बनण्याची इच्छा कुटुंबीयांनीही स्वीकारली | पुढारी

‘त्याची’ कुत्रा बनण्याची इच्छा कुटुंबीयांनीही स्वीकारली

टोकियो : कुणाची काय इच्छा असेल हे काही सांगता येत नाही. बार्बी बाहुलीसारखे किंवा कुठल्या तरी अ‍ॅनिमेशन पात्रासारखे आपण दिसावे यासाठी अनेक शस्त्रक्रिया करवून घेणारे अनेक तरुण-तरुणी जगाच्या पाठीवर आहेत. मात्र, कुणाला कुत्रा बनण्याचीही हौस असेल असे आपल्याला वाटले नव्हते. जपानच्या एका माणसाला अशी हौस होती व लाखो रुपये खर्च करून त्याने हुबेहूब कुत्र्यासारखा वेश बनवून घेतला. आता तो सतत याच वेशात राहत असतो. त्याची ही विचित्र इच्छा आता त्याच्या कुटुंबीयांनीही स्वीकारली आहे. ‘त्याला कुत्रा बनून राहायचे असेल तर राहू दे!’ अशीच त्यांची भावना आहे.

या माणसाचे नाव आहे टोको. त्याला असा ‘कुत्रा’ बनण्यासाठी 40 दिवस लागले. त्याने स्वतःच आपल्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया सांगितल्या आहेत. आपली ही नवी ओळख कुटुंबीयांनी स्वीकारली असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याने सांगितले, माझ्यामधील या बदलाने माझे कुटुंबीय आश्चर्यचकित होते. मात्र, आता त्यांनी हा बदल स्वीकारला असल्याचा मला आनंद आहे. कुत्रा बनल्यानंतर त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. ते पाहून अनेक लोक थक्क होत असतात. टोकोचे सर्व वर्तन एखाद्या कुत्र्यासारखेच असते. त्याचे व्हिडीओ हजारो वेळा पाहण्यात आले आहेत. तो एखाद्या खर्‍या कुत्र्यासारखेच लॉनवर बागडतो, खेळतो, फरशीवर लोळतो!

Back to top button