नव्वदीच्या उंबरठ्यावर ते पोहोचले माऊंट वॉशिंग्टनवर! | पुढारी

नव्वदीच्या उंबरठ्यावर ते पोहोचले माऊंट वॉशिंग्टनवर!

वॉशिंग्टन : विवाहाचा 66 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी अमेरिकेतील एका वृद्ध जोडप्याने अतिशय अनोखा मार्ग अवलंबला आणि तो प्रत्यक्षात साकारल्यानंतर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणे साहजिकच होते. न्यू हॅम्पशायर येथे राहणार्‍या या दाम्पत्याने माऊंट वॉशिंग्टन सर करण्याचा पराक्रम यावेळी गाजवला. गूडन्यूज मुव्हमेंट या इन्स्टाग्राम पेजवर याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

आता आपल्या विवाहाचा 66 वा वाढदिवस साजरा करणार्‍या या जोडगोळीचे वय देखील अनुक्रमे 88 व 85 इतके आहे. साहजिकच त्यांचे आराम करण्याचे दिवस. पण, यानंतरही त्यांनी विवाहाचा वाढदिवस थाटात साजरा करण्यासाठी अतिशय जोखमीचा मार्ग निवडला. हा साहसी टप्पा पार करण्यासाठी या वृद्ध जोडप्याला इरिक टॉड स्वीट या हायकरचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि त्याच्यामुळेच ते माऊंटेन वॉशिंग्टन सर करू शकले.

तीन दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 7.5 लाख लोकांनी पाहिला असून 55 हजार पेक्षा अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. या व्हिडीओवर इन्स्टाग्रामवर अनेक प्रतिक्रिया आल्या. यातील एका वृद्ध युजरने लिहिले, ‘या वयात मला जेवण केल्यानंतर बेडरूमच्या पायर्‍या चढणेही कठीण होते.’. अनेक युजरनी यावेळी या विलक्षण जोडप्याला शुभेच्छा दिल्या तर बर्‍याच जणांनी ही जोडगोळी सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

Back to top button