

इशिकावा : द्राक्षे खाणे हा अनेकांचा वीक पॉईंट असतो. अनेक ठिकाणी द्राक्षांचे मळेही फुलवले जातात. भारतात तर द्राक्षाच्या अनेक प्रजाती आढळून येतात. या द्राक्षांची किंमत त्यांच्या दर्जावरून ठरते. मात्र, जपानमधील एक लाल द्राक्षाची जात अशीही आहे, ज्याची किंमत आपल्याला हैराण करणारी आहे. हे लाल द्राक्षे विकत घेणे सर्वसामान्यांच्या अजिबात आवाक्यात असत नाही. जपानमध्ये अशा द्राक्षांची शेती केली जाते. तेथील वातावरण या द्राक्षांना अनुकूल असल्याने तेथे ती अधिक बहरते. पण, सर्वात धक्कादायक म्हणजे या लाल द्राक्षाच्या केवळ एका गुच्छाची किंमत चक्क 150 ग्रॅम सोन्याइतकी असते.
रुबी रोमन ही या लाल द्राक्षाची जात असून जगभरातील ते सर्वात महागडे द्राक्ष म्हणून ओळखले जाते. याची शेती जपानमधील इशिकावा भागात केली जाते. या लाल द्राक्षांची किंमत देखील लाखो रुपयांमध्ये असते. या रुबी रोमन द्राक्षांची विक्री केली जात नाही तर त्याचा लिलाव केला जातो. या द्राक्षांची शेती करण्यावरून रंजक कथा आहे. 1995 मध्ये इशिकावा भागात शेतकर्यांनी कृषी शास्त्रज्ञांना द्राक्षाच्या शेतीवर संशोधन करण्याची विनंती केली होती.
शास्त्रज्ञांनी ही नवी प्रजाती तयार करण्यासाठी थोडीथोडकी नव्हे तर 14 वर्षे खर्ची घातली. काही बदल होत होत त्याचा रंग लाल झाला आणि त्याचे नाव रुबी रोमन असे ठेवण्यात आले. याला इशिकावा या नावानेही ओळखले जाते. 2008 मध्ये या द्राक्षांची शेती सुरू झाली. सर्वप्रथम याची किंमत 700 ग्रॅमकरिता 73 हजार रुपये इतकी होती. नंतर 2016 मध्ये ही किंमत किती तरी पटीने वाढली आणि आता तर या द्राक्षांच्या एका गुच्छाची किंमत चक्क 9 लाख रुपये इतकी झाली आहे.