मेट्रो रेल्वेमध्ये सॉमरसॉल्ट!

दुबई : मेट्रो आजकाल प्रवासाचे उत्तम साधन झाले आहे. मेट्रोचा जलद व आरामदायी प्रवास हवाहवासा वाटणे त्यामुळे साहजिकच आहे. पण, ज्या मेट्रोतून प्रवास करायचा, त्यातून एखादी महिला सॉमरसॉल्टची प्रात्यक्षिके साकारते, असे आढळून आल्यास भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.
या व्हिडीओमध्ये थोडीफार गर्दी असलेली मेट्रो कोच दाखवली गेली आहे. यात काही प्रवासी उभे होते. मिशा शर्माने या कोचमध्ये किंचित गर्दी कमी असलेली जागा निवडली आणि तेथे आपली कौशल्ये दाखवण्यास सुरुवात केली.
आतापर्यंत हा व्हिडीओ 3.6 दशलक्ष जणांनी पाहिला असून त्यावर अनेकांनी स्तुतिसुमने उधळली तर काहींनी यावर आक्षेपही घेतला आहे. सॉमरसॉल्ट साकारण्यासाठी मेट्रो कोच ही योग्य जागा असू शकत नाही, असे यातील काहींनी म्हटले आहे.
काय असते सॉमरसॉल्ट?
सॉमरसॉल्ट हा जिम्नॅस्टिक्सचा एक भाग आहे. यामध्ये अॅथलिट कोलांटी उडी घेऊन पुन्हा जागेवर पूर्वीच्या स्थितीत लँड करतो. मिशा शर्मा ही स्वत: एक अॅथलिट राहिली असून अतिशय कमी जागेत तिने हे कौशल्य प्रत्यक्षात साकारले. यापूर्वी देखील देशातीलस्विविध ठिकाणी तिने असे स्टंट साकारले आहेत आणि तिचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आले आहेत.