रिकाम्या पोटी केळी खावीत का?

रिकाम्या पोटी केळी खावीत का?

नवी दिल्ली : केळी बाराही महिने बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियमसारखी खनिजे असतात. तसेच अनेक जीवनसत्त्वे व फायबरही असतात. त्यामुळे आरोग्यासाठी केळी अतिशय लाभदायक ठरतात. मात्र, केळी उपाशीपोटी खावीत की नको असा अनेकांना प्रश्न पडत असतो. रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याचे काही लाभही आहेत व काही तोटेही!

केळीच्या सेवनाने आतड्यातील संसर्ग दूर होतात. जर बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर सकाळी रिकाम्या पोटी केळी खाणे लाभदायक ठरते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते, असे तज्ज्ञांचे मत आहे. उपाशी पोटी केळी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. आपल्या शरीराला पोटॅशियम या खनिजाची गरज असते.

हा घटक आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे काम करतो. केळी हा पोटॅशियमचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे सकाळी दात घासल्यानंतर केळी खाणेही चांगले मानले जाते. सकाळी केळी खाल्ल्याने ती जलद गतीने लहान आतड्यापर्यंत जातात. त्यातील सर्व पोषक घटक जसेच्या तसे आतड्यात शोषली जातात. केळात ट्रिप्टोफॅन हे संयुग असते.

सॅरोटॉनिन संतुलनासाठी आवश्यक असलेल्या अमिनो आम्लांमध्ये ट्रिप्टोफॅनचा समावेश होतो. त्याचा उपयोग चिंता, तणाव, अस्वस्थता आणि निद्रानाश दूर करण्यासाठी होतो. उपाशी पोटी केळी खाण्याचे काही तोटेही आहेत. केळींमधील साखरेचे प्रमाण 25 टक्के इतके आहे. त्यामधून शरीराला ऊर्जा मिळते; पण ती ठराविक काळच टिकते. त्यानंतर लगेच थकवा जाणवू लागतो. रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास लगेच भूक जाणवू लागते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news