

लंडन : मंगळावरील जमिनीवरील वाळलेल्या चिखलामध्ये प्राचीन काळातील वैशिष्ट्यपूर्ण भेगा अजूनही टिकून राहिलेल्या आहेत. षटकोनी आकाराच्या या भेगा एकेकाळी जीवांचे अस्तित्व होते हे दर्शवणार्या असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. 2021 मध्ये 'नासा'च्या 'क्युरिऑसिटी' रोव्हरने माऊंट शार्प या नावाने ओळखल्या जाणार्या मंगळावरील पर्वताच्या उतारावर या भेगांची छायाचित्रे टिपली होती. मंगळावरील गेल क्रेटर नावाच्या विवरामध्ये हा तब्बल 5 किलोमीटर उंचीचा पर्वत आहे.
गेल क्रेटरमध्ये 2012 मध्ये 'नासा'चे क्युरिऑसिटी हे रोव्हर उतरले होते. आता तेथील या पर्वतावरील वाळलेल्या चिखलातील या पाच किंवा सहा बाजू असलेल्या आकृत्यांचे छायाचित्र त्याने पाठवलेले आहे. या आकृत्या 3.8 अब्ज ते 3.6 अब्ज वर्षांपूर्वीचे आहे. या आकृत्या म्हणजे वाळलेल्या चिखलातील भेगा असल्याचे सुरुवातीलाच संशोधकांच्या लक्षात आले होते. हा 'चिखल' म्हणजेच एकेकाळी मंगळभूमीवर असलेल्या पाण्याचाही पुरावा होता. मात्र, आता त्याच्याही पुढचे संशोधन झाले आहे. त्याची माहिती 'नेचर' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
संशोधकांनी या खुणांचे पुन्हा नव्याने विश्लेषण केले आणि त्यांना असे दिसून आले की या खुणा मंगळावरील पावसाळा आणि कोरड्या हवामानाच्या ऋतुचक्रामुळे बनलेल्या आहेत. असेच ऋतुचक्र पृथ्वीवरही आपण पाहत असतो. ते मंगळावरही एकेकाळी होते हे यानिमित्ताने प्रथमच दिसून आले. फ्रान्समधील नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चमधील खगोलशास्त्रज्ञ विल्यम रॅपिन यांनी सांगितले की मंगळावरील प्राचीन काळातील हवामानाचे हे महत्त्वाचे पुरावे आहेत. हे ऋतुचक्र रेणू स्वरूपातील उत्क्रांतीसाठीही उपयुक्त ठरलेले असू शकते ज्यामुळे जीवसृष्टीची निर्मिती शक्य आहे.