नवी दिल्ली : जगभरात सध्या सातत्याने तापमानात वाढ होत आहे. प्रचंड उष्णतेने जंगलांना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत; तर बहुतेक लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. थंड प्रदेशातील देश म्हणून ओळखल्या जाणार्या युरोप आणि अमेरिकन देशांमध्ये सध्या तापमानाचे नवनवे विक्रम प्रस्थापित होताना दिसत आहेत.
दरम्यान, संयुक्त राष्ट्राने एक गंभीर इशाराच जारी केला आहे. या जागतिक संघटनेच्या माहितीनुसार, जलवायू परिवर्तनामुळे एकट्या दक्षिण आशियातील सुमारे तीन चतुर्थांश मुले भीषण तापमानाच्या विळख्यात सापडली आहेत. अशा मुलांची संख्या तब्बल 46 कोटी इतकी आहे.
'युनिसेफ'च्या माहितीनुसार, सध्या जगातील सर्वाधिक तापमान दक्षिण आशियात आहे. जलवायू परिवर्तनामुळेच तापमानात असामान्य भर पडू लागली आहे. या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. एका आकडेवारीनुसार, दक्षिण आशियातील 18 वर्षांखालील सुमारे 76 टक्के मुले जास्त तापमान असलेल्या भागात राहतात. या मुलांची संख्या सुमारे 46 कोटी इतकी प्रचंड आहे; तर जागतिक स्तराचा विचार करावयाचा झाल्यास जगातील प्रत्येक तीनपैकी एक मूल वाढत्या उष्णतेने प्रभावित आहे.
'युनिसेफ'चे विभागीय संचालक संजय विजेशेकरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जागतिक तापमान सर्वोच्च पातळीवर आहे. दक्षिण आशियातील उष्णतेच्या लाटेमुळे कोट्यवधी मुलांचे जीवन प्रभावित झाले आहे. दक्षिण आशियातील देशांमध्ये वर्षातील सुमारे 83 दिवस तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. अशा तापमानात लहान मुले स्वत:ला अॅडजेस्ट करू शकत नाहीत. यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.