

बंगळूर : भारताचे 'चांद्रयान-3' आता चंद्राच्या कक्षेत पोहोचलेले आहे. यापूर्वी मंगळावरही 'मंगळयान' गेलेले आहे. आता चंद्र, मंगळच नव्हे तर सूर्याकडेही यान पाठवण्याची भारताने जय्यत तयारी केली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'चे 'आदित्य-एल-1' हे सूर्याकडे झेपावणारे यान आता मोहिमेसाठी सज्ज होत आहे. लवकरच हे यान सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी लाँच केले जाणार आहे.
'इस्रो'ने याबाबतची माहिती दिली आहे.
यू. आर. राव सॅटेलाईट सेंटरमध्ये बनलेले हे सॅटेलाईटवजा यान आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील 'इस्रो'च्या स्पेस सेंटरवर पोहोचले आहे. ते नेमके कधी लाँच केले जाणार आहे याची माहिती 'इस्रो'ने दिलेली नाही. मात्र, ते सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकते असे 'इस्रो'च्या एका अधिकार्याने म्हटले आहे. हे अंतराळयान सूर्य-पृथ्वी सिस्टीमच्या लॅग्रेंज पॉईंट 1 (एल-1) च्या चारही बाजूला एका हेलो ऑर्बिटमध्ये ठेवले जाण्याची शक्यता आहे. ही कक्षा पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे.
'लॅग्रेंज पॉईंट'चा अर्थ अंतराळातील असे बिंदू जिथे अंतराळातील दोन खगोल, जसे सूर्य आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे आकर्षण आणि प्रतिकर्षणचे क्षेत्र निर्माण होते. या बिंदूला इटालियन-फ्रेंच गणितज्ज्ञ जोसेफ-लुईस लॅग्रेंज यांचे नाव देण्यात आले आहे. 'इस्रो'ने म्हटले आहे की 'एल-1' पॉईंटच्या आसपास 'हेलो' ऑर्बिटमध्ये ठेवण्यात आलेल्या सॅटेलाईटच्या सहाय्याने सूर्याला कोणत्याही छाया किंवा ग्रहणाशिवाय सतत पाहत राहता येऊ शकते. वास्तविक वेळेतच सौर घडामोडी आणि सौर हवामानाची माहिती यामुळे मिळू शकते. या अंतराळयानात सात पेलोड आहेत जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टरचा वापर करून फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील कोरोनाचे निरीक्षण करण्यासाठी मदत करतील.