‘फर्निचर बनणे’ हा तिचा छंद! | पुढारी

‘फर्निचर बनणे’ हा तिचा छंद!

लंडन : सोशलवर एका महिलेचा विचित्र छंद आश्चर्याचा धक्का देणारा ठरत आहे. या महिलेला चक्क फर्निचर बनण्याचा विचित्र छंद असून यामुळे ती काही काळ घरातील फर्निचर असल्यासारखे वागते आणि तिच्या या वर्तणुकीचा सार्‍यांनाच त्रास जाणवत आला आहे.

तसे पाहता जवळपास सर्वांनाच काही ना काही छंद, काही ना काही आवडीनिवडी असतात. प्रत्येकाची ध्येयेदेखील निरनिराळी असतात. काहींना उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर काम करण्याचे ध्येय खुणावत असते, तर काहींना जगभर फिरण्याची हौस असते. मात्र, याच जगात एक अशीही महिला आहे, जिला घरातील फर्निचर होणे आवडते आणि या फर्निचरच्या रूपात असल्यासारखे वागत ती सर्वांनाच हैराण करून टाकते. या विचित्र छंदामुळे काही वेळा ती लॅम्प होऊन कोपर्‍यात उभी राहते, तर काही वेळा घड्याळाप्रमाणे भिंतीला चिकटून जणू घड्याळ बनून राहते!

ऑलिम्पिया, असे या विचित्र महिलेचे नाव असून तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एकदा तिच्या घरातील एक व्यक्ती सोफा समजून तिच्यावर बसली आणि त्याच क्षणापासून तिला फर्निचर बनण्याचा छंद जडला. काही वेळा ती टेबलसारखी बसून राहते, तर काही वेळा खुर्चीसारखे एकाच जागी तासन् तास स्तब्ध राहते. यूट्यूबवर तिचे अनेक व्हिडीओ असून ते लाखो लोकांनी पाहिले आहेत.

Back to top button