Lottery : तिकीट न काढताच लागली लॉटरी; तीस वर्षांपर्यंत दर महिन्याला १० लाख रुपये मिळणार | पुढारी

Lottery : तिकीट न काढताच लागली लॉटरी; तीस वर्षांपर्यंत दर महिन्याला १० लाख रुपये मिळणार

लंडन : कुणाचं नशीब कधी व कसे फळफळेल हे काही सांगता येत नाही. असाच प्रकार जॉन स्टेम्ब्रिज नावाच्या 51 वर्षे वयाच्या माणसाबाबत घडला आहे. त्याला एक दिवस अचानक एक लॉटरी तिकीट (Lottery) सापडले आणि या तिकिटामुळे त्याला आता घरबसल्या दर महिन्याला दहा लाख रुपये मिळणार आहेत व तेही तब्बल तीस वर्षांसाठी!

जॉन लोकांच्या घरांना प्लास्टर करण्याचे काम करीत होते. त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे घर नव्हते व ते व्हॅनमध्येच राहायचे. एक दिवस ते व्हॅनमध्ये बसून कॉफी पित होते. याच दरम्यान काही मिनिटांमध्ये त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे याची त्यांनाही कल्पना नव्हती. जॉन यांनी सांगितले की ते दिवसभराचे काम संपवून व्हॅनमध्ये कॉफी पित होते. इतक्यात त्यांची नजर कारच्या विजरच्या मागे ठेवलेल्या तिकिटावर (Lottery) पडली. ते दुकान जवळच असल्याने त्यांनी तिकीट तपासण्याचा विचार केला. स्टोअर असिस्टंटने ते तिकीट मशिनमध्ये घातलं त्यावेळी एक विचित्र आवाज आला.

त्यानंतर असिस्टंटने त्यांना तिकीट (Lottery) क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले कारण ते ‘विनिंग’ तिकीट होते. तेव्हा जॉन यांना एक-दोन लाखांचे बक्षीस मिळेल असे वाटले; पण जे बक्षीस मिळाले ते पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. जॉन यांना मिळालेल्या या तिकिटातून पुढील तीस वर्षांपर्यंत त्यांना दर महिन्याला दहा लाख रुपये मिळतील व तेही करमुक्त! वयाच्या 81 व्या वर्षांपर्यंत त्यांना हे पैसे मिळणार असल्याने त्यांनी नोकरी सोडून आपला प्रवास करण्याचा छंद पूर्ण करण्याचे ठरवले आहे. त्यांना फोटोग्राफीचाही छंद असून त्यांनी स्वतःसाठी एक लक्झरी कॅम्पर व्हॅनही खरेदी केली आहे.

Back to top button