चीनमध्ये मानवाच्या वेगळ्या प्रजातीचा शोध? | पुढारी

चीनमध्ये मानवाच्या वेगळ्या प्रजातीचा शोध?

बीजिंग : होमो हॅबिलिस (हाताचा कुशलतेने वापर करणारा मानवी पूर्वज), होमो इरेक्टस (पाठीचा कणा ताठ ठेवून चालणारा मानवी पूर्वज) असा प्रवास करीत बुद्धीचा मोठा विकास झालेली ‘होमो सेपियन’ ही मानवी प्रजाती विकसित झाली. हेच आधुनिक मानवाचे पूर्वज होते असे मानले जाते. मात्र, कालौघात विकसित झालेली ही एकमेव मानवी प्रजाती नव्हती. निएंडरथलपासून ते होमो फ्लोरेसिएन्सिसपर्यंत अन्यही अनेक मानवी प्रजाती होत्या, ज्या काळाच्या ओघात लुप्त झाल्या किंवा होमो सेपियन्समध्ये मिसळून गेल्या. आताही संशोधकांनी मानवाची एक वेगळी प्रजाती शोधून काढल्याचा दावा केला आहे. त्यांना तीन लाख वर्षांपूर्वीच्या एका मुलाची कवटी सापडली आहे. ही प्राचीन काळातील एक वेगळी मानव प्रजाती होती असे संशोधकांचे म्हणणे आहे.

संशोधकांना जे जीवाश्म सापडले आहेत त्यामध्ये कवटी, जबडा आणि पायाच्या हाडांचा समावेश आहे. हा शोध आताच लागला आहे असे नाही तर हे अवशेष 2019 मध्येच चीनच्या हुआलोंगडोंग येथे शोधण्यात आले होते. त्यावेळेपासून या अवशेषांचा अभ्यास सुरू होता व आता संशोधकांनी ही वेगळी मानव प्रजाती असल्याचे म्हटले आहे.

या कवटीच्या अभ्यासावरून असे दिसून आले की या व्यक्तीचा चेहरा होमो सेपियन्स, निएंडरथल किंवा डेनिसोवन्स यापैकी कोणत्याही मानव प्रजातीशी मिळताजुळता नाही. मानवी वंशवृक्षातील ही निसटलेली शाखा असावी असे संशोधकांना वाटते. या प्रजातीच्या मानवांमध्ये ‘हनुवटी’चा भाग नव्हता. त्यामुळे त्यांचे डेनिसोवन या मानव प्रजातीशी थोडे साम्य आहे. डेनिसोवन ही आशियामध्ये अस्तित्वात असलेली व 4 लाख वर्षांपूर्वीच निएंडरथलपासून वेगळी झालेली मानव प्रजाती आहे.

चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेजच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या मुलाच्या शरीराचे हे अवशेष सापडले आहेत तो मृत्यूवेळी बारा-तेरा वर्षांचा असावा. त्याची कवटी, जबडा व अन्य अवयव लाखो वर्षांपूर्वीची साक्ष देतात. त्याच्या चेहर्‍याची अन्य वैशिष्ट्ये आधुनिक मनुष्याशी मिळतेजुळते आहेत. त्यावरून संशोधकांच्या टीमला खात्री वाटते की त्यांनी होमिनिनची एक पूर्णपणे नवी प्रजाती शोधली आहे. ही एक ‘हायब्रीड ब्रँच’ म्हणजेच संकरित प्रजाती असून ती आधुनिक मानव आणि डेनिसोवन्स यांच्या मिलाफातून बनली असावी.

Back to top button