2025 मध्ये चंद्रावर जाऊ शकणार नाही माणूस! | पुढारी

2025 मध्ये चंद्रावर जाऊ शकणार नाही माणूस!

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या अपोलो मोहिमांमध्ये अनेक अंतराळवीर चांद्रभूमीवर जाऊन आले होते. त्यानंतर गेल्या पन्नास वर्षांत माणसाचे चांद्रभूमीवर पाऊल पडलेले नाही. आता ‘नासा’ने आपल्या ‘आर्टेमिस’ मोहिमेतून पुन्हा एकदा अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, त्यासाठीचे अंतराळयान अद्याप तयार झाले नसल्याने 2025 मध्ये या मोहिमेतून अंतराळवीर चंद्रावर जाण्याची शक्यता धूसर झाली आहे. या मोहिमेस विलंब होणार हे आता स्पष्ट होत आहे.

‘नासा’ने म्हटले आहे की ‘आर्टेमिस’ मोहिमेतून अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणे आणि त्यांना तिथे उतरवणे सध्या शक्य नाही. एका प्रेस ब्रीफिंगवेळी ‘नासा’च्या ‘एक्सप्लोरेशन सिस्टिम डेव्हलपमेंट मिशन’ संचालनालयाचे सहायक प्रशासक जिम फ्री यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. एलन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’कडून तयार केल्या जात असलेल्या लँडिंग सिस्टिमवर अधिक लक्ष देण्यासह अन्यही अनेक महत्त्वपूर्ण घटकांची पूर्ण तयारी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर या सर्व गोष्टी निश्चित वेळेत घडल्या नाहीत तर या मोहिमेऐवजी एक पर्यायी मोहीम सुरू होऊ शकते.

आर्टेमिस मोहिमेत चंद्रावर माणूस पाठवणे तसेच चांद्रभूमीवर एक असा तळ निर्माण करणे जो मंगळावर माणसाला पाठवण्याच्या मार्गातील एक ‘थांबा’ असेल अशी ‘नासा’ची योजना होती. मंगळाचा मार्ग साफ करण्यासाठी चंद्रावर असा स्थायी तळ बनवण्याचे ‘नासा’चे प्रयत्न आहेत. ‘आर्टेमिस-1’ मोहिमेत 2022 मध्ये पहिले मिशन लाँच करण्यात आले होते. त्यामध्ये एक मानवरहीत यान अंतराळात पाठवण्यात आले होते. सर्वात महत्त्वाचे ‘आर्टेमिस-3’ आहे जे डिसेंबर 2025 मध्ये नियोजित केले होते. त्यामध्ये 1972 नंतर प्रथमच माणसाला चांद्रभूमीवर पाठवले जाणार होते.

Back to top button