

पॅरिस : 'युनेस्को'ने ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात असणार्या 'ग्रेट बॅरियर रीफ' या जगातील सर्वात मोठ्या प्रवाळरांगांच्या रक्षणाबाबत आशा व्यक्त केली आहे. या प्रवाळांना 'धोक्यात असलेली जागतिक वारसास्थळे' या यादीत आताच समाविष्ट करू नये, असे 'युनेस्को'ने म्हटले आहे. किमान वर्षभर तरी या प्रवाळरांगांचा समावेश अशा यादीत करू नये, असे 'युनेस्को'चे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियाकडून या प्रवाळरांगांच्या सुरक्षेसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांचाही 'युनेस्को'ने उल्लेख केला आहे.
'कोरल रीफ' ही पाण्याच्या तळाशी असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण इकोसिस्टीम असते. खडकांसारखे दिसणारे हे रीफ सूक्ष्म अशा लाखो 'कोरल पॉलिप्स' नावाच्या सजीवांच्या वसाहतींनी बनलेले असतात. त्यांना कॅल्शियम कार्बोनेटने एकत्र सांधलेले असते.'कोरल' हे समुद्रतळाशी एका बाजूने जोडले गेलेले वैशिष्ट्यपूर्ण सजीव आहेत, मात्र ते वनस्पती नाहीत. तसेच खडकांसारखा दिसणारा त्यांच्या वसाहतींचा समूह हा निर्जीवही नसतो. बहुतांश कोरल रीफ किंवा प्रवाळ रचना या खडकाळ असतात आणि त्या अशा पॉलिप्सच्या समूहांनी बनलेल्या असतात.
ऑस्ट्रेलियातील 'ग्रेट बॅरियर रीफ'ही जगातील सर्वात मोठी प्रवाळरांग आहे. तिच्यामध्ये 2900 पेक्षाही स्वतंत्र प्रवाळभित्ती व 900 बेटं समाविष्ट आहेत. एकूण 2300 किलोमीटरमध्ये ही प्रवाळरांग पसरलेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडच्या किनार्याजवळ कोरल सीमध्ये समुद्रतळाशी ही प्रवाळरचना आहे. विशेष म्हणजे अंतराळातूनही ही प्रवाळरचना दिसून येते.
सजीवांनी निर्माण केलेली ही जगातील सर्वात मोठी रचना आहे. 1981 मध्ये 'ग्रेट बॅरियर रीफ'चा समावेश 'युनेस्को'च्या जागतिक वारशांच्या यादीत झाला. सध्या हवामान बदल, जागतिक तापमानवाढ व प्रदूषणामुळे या प्रवाळरांगांना धोका निर्माण होत आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांच्या संरक्षणासाठी सकारात्मक पावले उचलली असल्याचे आता 'युनेस्को'ने म्हटले आहे.