तीस हत्ती, तीन डायनासोरइतक्या वजनाचा जलचर | पुढारी

तीस हत्ती, तीन डायनासोरइतक्या वजनाचा जलचर

लीमा : जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी म्हणजे आफ्रिकन हत्ती. मात्र, संपूर्ण पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी महासागरांमध्ये राहतो व तो म्हणजे निळा देवमासा. या निळ्या देवमाशापेक्षाही मोठ्या व वजनदार अशा प्राचीन व्हेलची नोंद झालेली आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात या प्राचीन व्हेल माशाचे जीवाश्म सापडले आहे. हा मासा तीस हत्ती किंवा तीन महाकाय डायनासोरपेक्षाही मोठा होता. त्याचे अनुमानित वजन 340 मेट्रिक टन इतके होते. हा पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वात वजनदार शरीराचा प्राणी ठरू शकतो!

‘नेचर’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. संशोधक जियोवानी बियानुची यांनी ही माहिती दिली. या प्राचीन व्हेल प्रजातीला ‘पेरुसेटस कोलोसस’ असे वैज्ञानिक नाव आहे. त्याचा एक आंशिक सांगाडा सापडला आहे. त्यामध्ये मणक्याची तेरा हाडे, चार फासळ्या आणि कुल्ह्याच्या एका हाडाचा समावेश आहे. या जीवाश्माचे सॅम्पल 25 मीटर म्हणजेच 82 फूट लांब होते. ते निळ्या देवमाशापेक्षा कमी वाटत असले तरी त्याच्या सांगाड्याचे वजन हे कोणत्याही सस्तन प्राण्याच्या वजनापेक्षा अधिक आहे.

पेरुसेटसचे वजन हे निळ्या देवमाशापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट अधिक होते. निळ्या देवमाशाचे कमाल वजन 149.6 मेट्रिक टन असते. बियानुची यांनी सांगितले की प्राचीन काळातील हे मासे सध्याच्या दोन निळे देवमासे, तीन अर्जेंटिनोसॉर (विशाल सॉरोपॉड डायनासोर), तीसपेक्षा अधिक आफ्रिकन जंगली हत्ती आणि पाच हजारपेक्षा अधिक लोकांइतक्या वजनाचे होते. हा मासा आपले मोठे वजन आणि पोहण्याच्या अनोख्या शैलीमुळे हळूहळू पोहत असावा असे संशोधकांना वाटते. त्याची हाडे अतिशय सघन होती. त्यामुळे त्याच्या सांगाड्याचे वजनही मोठे होते.

संबंधित बातम्या
Back to top button