वाढत्या तापमानाचा प्राण्यांवरही होतोय विपरीत परिणाम | पुढारी

वाढत्या तापमानाचा प्राण्यांवरही होतोय विपरीत परिणाम

न्यूयॉर्क : एका नव्या संशोधनात आढळले आहे की हवामान बदलाचा, जागतिक तापमानवाढीचा विपरीत परिणाम प्राण्यांवरही होत आहे. ‘कॅबी रिव्ह्यूज’ मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संशोधनासाठी प्राण्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची पाहणी करण्यात आली. त्यांचे खाणे-पिणे, वातावरण आणि वर्तनाचाही अभ्यास करण्यात आला. जगाच्या वाढत्या तापमानामुळे प्राण्यांवरही तणाव निर्माण होत असल्याचे यामध्ये दिसून आले. त्यामुळे त्यांची उत्पादन क्षमताही कमी होत आहे. संशोधनानुसार गायींची दूध देण्याची क्षमता 35 टक्के कमी झाली आहे.

तापमानात वाढ झाल्याने अनेक हत्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच कुत्र्यांमधील वजन वाढण्यामागेही तापमानवाढ असल्याचे दिसून आले. हवामान बदलाचा परिणाम पाहण्यासाठी वटवाघूळ, झेब्राफिश, बेडूक, कोआला, आफ्रिकन हत्ती, कोंबड्या व अन्य पक्षी तसेच गायींवरही संशोधन करण्यात आले. संशोधनात म्हटले आहे की पक्ष्यांमध्ये उष्णता सहन करण्याची मर्यादित क्षमता असते. त्यांच्यामध्ये घामाच्या ग्रंथी नसतात. ते धापा टाकून आपल्या हालचाली कमी करतात आणि अधिक पाणी पितात. या मार्गाने ते स्वतःला थंड ठेवण्याचा प्रयत्न करतात. अधिक तापमानामुळे कोंबड्यांच्या जीवनावरही परिणाम झाला आहे. तसेच त्यांच्या मांसाचा दर्जाही कमी झाला आहे.

संशोधक डॉ.एडवर्ड नारायण यांनी सांगितले की तापमानवाढीमुळे आफ्रिकन देशांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे हत्तींचा मृत्यू होत आहे. कोआला या प्राण्याला आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक ऊर्जेचा वापर करावा लागतो. ही ऊर्जा त्यांना युकेलिप्टस झाडांच्या पानांमधून मिळते. हवामान बदलामुळे ही झाडेही कमी होऊ लागली आहेत. त्याचा कोआला प्राण्यांना फटका बसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेक लोक पाळीव कुत्र्यांना फिरवण्यासाठी बाहेर नेत नसल्याने हे श्वान आळशी होऊन त्यांचे वजनही वाढत आहे!

Back to top button