Strawberries : रोज स्ट्रॉबेरीचे सेवन मेंदू, हृदयासाठी लाभदायक | पुढारी

Strawberries : रोज स्ट्रॉबेरीचे सेवन मेंदू, हृदयासाठी लाभदायक

वॉशिंग्टन : एका नव्या संशोधनातून समोर आले आहे की, रोज स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने मेंदूचा विकास, उच्च अँटिऑक्सिडंट क्षमता आणि रक्तदाब यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. स्ट्रॉबेरीच्या सेवनाने हृदय आणि मेंदूच्या विकासामध्ये कोणते लाभ होतात, हे पाहण्यासाठी याबाबतचे संशोधन करण्यात आले होते.

या संशोधनासाठी 66 ते 78 वर्षे वयोगटातील 35 निरोगी पुरुष व महिलांची एक पाहणी करण्यात आली. या लोकांनी स्ट्रॉबेरीच्या 26 ग्रॅम भुकटीचे सेवन केले जे रोज स्ट्रॉबेरीच्या दोन सर्व्हिंगइतके होते. आठ आठवड्यांपर्यंत प्रत्येकाला स्ट्रॉबेरीची पावडर देण्यात आली. स्ट्रॉबेरीच्या सेवनाने मेंदूच्या आकलन क्षमतेमध्ये 5.2 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच सिस्टोलिक रक्तदाबात 3.6 टक्क्यांनी घट झाली. एकूण अँटिऑक्सिडंट क्षमतेत 10.2 टक्क्यांची उल्लेखनीय वृद्धी पाहण्यास मिळाली.

सॅन दियागो स्टेट युनिव्हर्सिटीतील स्कूल ऑफ एक्सरसाईज अँड न्यूट्रिशन सायन्सेजचे प्रा. शिरीन होशमंद यांनी सांगितले की, या संशोधनावरून असे दिसून आले की, स्ट्रॉबेरीचे सेवन मेंदूच्या विकासाला उत्तेजन देऊ शकते. तसेच उच्च रक्तदाबासारख्या हृदयाशी संबंधित समस्या कमी करू शकते. दैनंदिन आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश केल्यानेच आरोग्यामध्ये इतके लाभ होऊ शकतात. स्ट्रॉबेरी हे अनेक बायोएक्टिव्ह घटकांचा स्रोत आहे. आपल्या दैनंदिन ‘क’ जीवनसत्वाची गरज ते शंभर टक्के भागवू शकते. तसेच स्ट्रॉबेरीमध्ये फोलेट, पोटॅशियम, फायबर, फायटोस्टेरॉल आणि पॉलिफेनॉलसारखे हृदयासाठी पोषक घटक असतात. या संशोधनाचे निष्कर्ष अलीकडेच अमेरिकेन सोसायटी ऑफ न्यूट्रिशनच्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात आले.

Back to top button