

वॉशिंग्टन : सध्याच्या 2023 या वर्षामध्ये जगभर भीषण उन्हाळा जाणवत आहे. उत्तर गोलार्धात उष्णतेची लाटच आलेली आहे. दक्षिण गोलार्धातही तापमानवाढ व हवामान बदलाचे परिणाम अभूतपूर्व स्तरावर गेले आहेत. संशोधकांना आढळले आहे की उन्हाळ्यात तेथील जितके बर्फ वितळले त्या प्रमाणात थंडीमध्ये बर्फाचे प्रमाण वाढले नाही. गेल्या 45 वर्षांपासून येथील बर्फाची नोंद ठेवली जात आहे. इतक्या काळात सर्वात कमी प्रमाणात बर्फ आता दिसून आला आहे. अर्जेंटिना या देशाच्या क्षेत्रफळाइतका बर्फ वितळलेला असल्याचे आढळले.
नॅशनल स्नो अँड आइस डेटा सेंटरच्या आकडेवारीनुसार यावर्षीचा बर्फ 2022 च्या तुलनेत 16 लाख चौरस किलोमीटर कमी आहे. जुलैच्या मध्यास अंटार्क्टिकाचा सागरी बर्फ 1981 ते 2010 च्या सरासरीपेक्षा 26 लाख चौरस किलोमीटर कमी होता. हा बर्फ दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेंटिना या देशाच्या क्षेत्रफळाइतका आहे. ही घटना असामान्य असल्याचे काही संशोधकांनी म्हटले आहे. लाखो वर्षांमध्ये एकदाच घडणारी ही घटना आहे. मात्र, कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठाचे ग्लेशियोलॉजिस्ट टेड स्क्रॅम्बोस यांनी सांगितले की ही घटना सामान्य शब्दांमध्ये समजावून सांगितली जाऊ शकत नाही. खेळ बदललेला आहे. आता त्याच्या शक्यतांबाबत बोलण्यात अर्थ नाही! याचे कारण म्हणजे सिस्टीम ज्या प्रकारची होती, तशी आता राहिलेली नाही. सिस्टीम पूर्णपणे बदलली असल्याचाच हा थेट संकेत आहे.