वॉशिंग्टन : स्वप्नवत, शाही विवाहसोहळा हे जवळपास प्रत्येकाचे स्वप्न असते. अशा विवाहसोहळ्यांसाठी कित्येक लाखो-कोटींचा खर्च तर केला जातोच. पण, त्याही शिवाय प्रदीर्घ कालावधीपासून त्यासाठी तयारी देखील केली जाते. अर्थात, आधुनिक युगात मात्र अशा सोहळ्यांचे स्वरूप पारंपरिकतेची चौकट मोडून खर्या अर्थाने स्काय ईज द लिमिटचे प्रत्यंतर आणून देत आहे. सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनुसार, एका नवदाम्पत्याने आपला विवाह चिरंतन काळ स्मरणात राहावा, यासाठीच एक अफलातून आयडिया शोधून काढली आणि यात त्या दोघांनी स्वत: सहभाग घेत सर्व वर्हाडी मंडळींना देखील स्काय-डायव्हिंगची सफर घडवून आणली!
उंचावर जाऊन तेथून हवेत झेपावणे सहजसोपे अजिबात असत नाही. पॅराशूट सोबत असले तरी ही उडी घेण्यासाठी देखील वाघाचे काळीज लागते. पॅराशूट केव्हा उघडेल, उघडेल की नाही, अशी चिंता सतावत असते. आता असे स्काय-डायव्हिंग एखाद्या विवाह सोहळ्यात करायचे म्हटले तर आणखी भुवया उंचावतील. पण, प्रिस्किला व फिलिपो यांनी आपल्या विवाह सोहळ्यात हीच अभिनव कल्पना राबवली व यशस्वीही करून दाखवली.
याचा व्हिडीओ व्हायरल होताच युजर्सनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या. काहींनी हा अनुभव थरारक असेल, असे मत मांडले तर काहींनी भीतीपोटी आपण अशा सोहळ्यांना जाताना हजार वेळा विचार करू, असे रोखठोकपणे सांगून टाकले. एका युजरने केवळ व्हिडीओ पाहूनच अंगावर शहारे येत असतील तर प्रत्यक्षात काय होत असेल, असा प्रतिप्रश्न यावेळी उपस्थित केला.