सुपर मार्केटमधील ट्रॉलीही देणार स्ट्रोकचा इशारा! | पुढारी

सुपर मार्केटमधील ट्रॉलीही देणार स्ट्रोकचा इशारा!

लंडन : सुपरमार्केटमध्ये खरेदी करीत असताना सामान ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी ट्रॉली आता स्ट्रोकचा धोकाही सांगू शकेल. संशोधकांनी एक असे सेन्सर बनवले आहे जे ट्रॉलीच्या हँडलमध्ये लावलेले असेल. ते हृदयाच्या असामान्य ठोक्यांची (अबनॉर्मल हार्ट बीट) तपासणी करील. त्यामध्ये बसवण्यात आलेली एक छोटी स्क्रीन धोका असेल तर लाल फुली दाखवेल आणि धोका नसेल तर हिरवी ‘टिक’ दर्शवेल.

ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये दर 45 पैकी एका व्यक्तीस आर्टियल फिब्रिलेशन (एएफ) आहे. या स्थितीत हृदयाचे ठोके अनियमित बनतात. त्यामुळे स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो. अनेक लोकांना त्याची लक्षणे वेळीच न समजल्याने या धोक्याची जाणीवच नसते. त्यामुळे संशोधकांनी आर्टियल फिब्रिलेशनचा छडा लावण्याची नवी पद्धत शोधली आहे. जगभरात 4 कोटी लोकांना स्ट्रोक येतो. त्यापैकी अनेक लोकांना शॉपिंगवेळी स्ट्रोक आल्याचे दिसून आले आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की सुपर मार्केट किंवा मॉलमध्ये यापासून बचावासाठी ट्रॉलीमध्ये इलेक्ट्रोकार्डियोग्राम (इसीजी) सेन्सर लावले जातील व त्या माध्यमातून हार्टबीटस्ना ट्रॅक केले जाईल. 2155 लोकांवर यासाठी तीन महिने पाहणी करण्यात आली. त्यासाठी दहा शॉपिंग ट्रॉलींच्या हँडलवर हे सेन्सर बसवण्यात आले. सहभागी लोकांना हे हँडल एक मिनिट पकडण्यास सांगण्यात आले. त्यामध्ये आढळले की सेन्सरमध्ये नॉर्मल हार्टबीटस् असलेल्या लोकांसाठी ग्रीन लाईट लागली तर अबनॉर्मल हार्ट बीटस् असलेल्या लोकांसाठी रेड लाईट लागली.

Back to top button