पाण्यातील शंभर फूट खोल गुहेत गेला आणि... | पुढारी

पाण्यातील शंभर फूट खोल गुहेत गेला आणि...

वॉशिंग्टन : एका स्कूबा डायव्हरने पाण्याखाली असलेल्या गुहेत तब्बल शंभर फूट खोलवर जाण्याचे धाडस केले; पण त्यामुळे त्याला जगातील अत्यंत दुर्मीळ अशा विकाराचा सामना करावा लागला. त्याच्या रक्तवाहिन्यांमधून द्रवपदार्थ बाहेर येऊ लागला. या जीवघेण्या रक्तविकारामधून सुदैवाने त्याची सुटका झाली!

ज्यावेळी माणूस अतिशय खोलवर असलेल्या उच्च दाबाच्या ठिकाणी जातो व त्यानंतर पृष्ठभागावरील कमी दाबाच्या ठिकाणी येतो, त्यावेळी त्याच्या रक्तामध्ये हवेचे बुडबुडे तयार होतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये वक्रपणा येतो. या स्थितीला ‘डिकम्प्रेशन सिकनेस’ असे म्हटले जाते. या विकारामुळे सांधेदुखी, चक्कर येणे व तीव — स्वरूपाचा थकवा अशी लक्षणे निर्माण होतात.

हा एक धोकादायक प्रकार आहे. अशा स्थितीमधील रुग्णाला विशिष्ट हायपरबॅरिक चेम्बरमध्ये उच्च दाब आणि ऑक्सिजन पुरवठ्याच्या सुविधेत ठेवले जाऊन योग्य उपचार केले जातात. ‘बीएमजे केस रिपोर्टस्’ या नियतकालिकात संबंधित रुग्णाची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. या डायव्हरला ‘सिस्टेमिक कॅपिलरी लीक सिंड्रोम’ (एससीएलएस) हा विकार झाला होता. मात्र, योग्य उपचारामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले. वयाच्या चाळीशीत असलेल्या या माणसाने समुद्रातील खोल गुहेत शंभर फूट किंवा तीस मीटर खोलीपर्यंत 40 मिनिटे स्कूबा डायव्हिंग केले होते. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्याला हा त्रास सुरू झाला होता.

Back to top button