कोळ्यांना आठ पाय का असतात? | पुढारी

कोळ्यांना आठ पाय का असतात?

वॉशिंग्टन ः निसर्गाने प्रत्येक जीवाला एकाच संख्येने पाय दिलेले नाहीत. माणसाला दोन पाय असतात तर कुत्र्याला चार, अनेक कीटकांना सहा पाय असतात तर बहुपाद प्राण्यांमध्ये अगदी हजारावर पायही असू शकतात. अशा स्थितीत कोळ्यांना आठ पायच का असतात हे जाणून घेणेही रंजक आहे.

फ्रेडोनियामधील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथील इनव्हर्टिब्रेट पॅलियोंटोलॉजीचे सहायक प्राध्यापक थॉमस हेग्ना यांनी सांगितले, या प्रश्नाचे सर्वात सोपे उत्तर म्हणजे कोळ्यांच्या पूर्वजांना आठ पाय होते! 50 कोटी वर्षांपूर्वीच्या कोळ्यांच्या पूर्वजांनाही आठच पाय होते. हे कोळी मध्य कॅम्ब्रियन काळातील होते. आथ्रोपॉडस् म्हणजेच संधीपाद प्राण्यांच्या ‘चेलिसेरेट’ या समूहाच्या वंशावळीतील हा मुळाचा भाग आहे. याच समूहात कोळ्यांचा समावेश होतो. त्याच्याही मागे जायचे झाल्यास 54 कोटी 10 लाख वर्षांपूर्वी आपल्याला महासागरातील लोबोपॉडस् आढळतील. ते सर्व संधीपाद प्राण्यांचे पूर्वज होते. ‘लोबोपॉड’ हे एकाच प्रजातीशी संबंधित नाव नाही.

यामध्ये जटील शरीररचना असलेल्या अनेक प्रजाती समाविष्ट होत्या. मुळात ते अळ्यांसारखे खंडित दिसणार्‍या शरीराचे होते. प्रत्येक खंडावर दोन्ही बाजूला पायांची एक जोडी होती. हा पॅटर्न त्यांच्या शरीराच्या लांबीइतका होता. या लोलोपॉडस्चा अधिक विकास झाल्यावर त्यांनी आपल्या शरीराचे खंड कमी करून पायांना विशेष रूप देण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या चेलीसेरेटस्नी अनेक छोट्या खंडांऐवजी दोनच खंडांमध्ये शरीराची विभागणी केली होती. त्यामध्ये एक डोके आणि दुसरा पोटाचा भाग होता.

याच काळात 31 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी कोळी विकसित झाले. त्यांनी असे शरीर मिळवले होते जे विकसित होण्यास 15 कोटी वर्षांपूर्वीच सुरुवात झाली होती. पर्यावरणाच्या कोणत्या स्थितीमुळे चेलीसेरेटस्ना आठ पायांची व्यवस्था स्वीकारावी लागली हे अस्पष्ट आहे. शिकागो युनिव्हर्सिटीतील मरीन बायोलॉजिकल लॅबोरेटरीच्या संचालिका व डेव्हलपमेंटल बायोलॉजिस्ट निपम पटेल यांनी सांगितले, हे पाय म्हणजे खरे तर त्यांच्या तोंडाचाच एक भाग होते.

कोळी, कीटक व अनेक सहस्त्रपाद जीवांचे काही परिशिष्ट अवयव असलेले समान पूर्वज होते. या अवयवांमध्ये पाय, अँटेना आणि अगदी विशिष्ट जबड्यांचाही समावेश होता. कोळ्यांमध्येही पाय हे त्यांच्या तोंडाचाच एक भाग म्हणून विकसित झाले होते. त्यांचे भ्रूण पाहिले तर ते अगदी त्यांच्या तोंडातूनच निघाल्यासारखे दिसतात. मात्र, कालांतराने त्यांनी त्याचा वापर चालण्यासाठी सुरू केला!

Back to top button