

बीजिंग : साठाव्या वर्षी खरे तर अनेक लोक आजी-आजोबा बनत असतात; मात्र या वयात कुणी आई बनू शकते याची आपण कल्पनाही करणार नाही. चीनमध्ये मात्र १७ सप्टेंबरला एका महिलने वयाच्या साठाव्या वर्षी मुलीला जन्म दिला आहे. या बाळाचे वजन २.८ किलो असल्याचे सांगितले जात आहे. या महिलेचे नाव झांग असे आहे.
चार वर्षांपूर्वी या महिलेने तिच्या एकुलत्या एका मुलाला गमावलं. याच दुःखात तिने पुन्हा अपत्यास जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि दोन वर्षांपूर्वी एका मुलाला जन्म दिला, त्यानंतर वयाच्या ६० व्या वर्षी तिने एका मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर आता या महिलेच्या कुटुंबात दोन मुलं आहेत. झांगचं असं म्हणणं आहे की, त्यांना दोन्ही मुलांना एकत्र वाढताना पाहायचं आहे. वयाच्या ६० व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतल्यानंतर महिलेवर अनेकांनी टीका केली. पण महिलेचं असं म्हणणं आहे की, ती स्वतःला वयस्कर मानत नाही. महिलेला आजही असं वाटतं की, ती आजही तरुण आणि स्वस्थ आहे. या महिलेच्या कुटुंबात दीर्घायूष्याची जणू परंपराच आहे. तिच्या वडिलांनी वयाच्या शंभराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, तर आई आता ९४ वर्षांची आहे आणि तिचे डोळे व कान अजूनही चांगले आहेत. एवढंच नाही, तर या महिलेची आई इतक्या उतार वयातही पायऱ्या चढते.
झांग यांच्या पतीने सुरुवातीला या वयात मूल जन्माला घालण्याच्या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली होती; मात्र झांग यांनी त्यांना आपण या निर्णयासाठी तयार असल्याचं आश्वस्त केलं. त्यांचं म्हणणं आहे की, त्या आपल्या निर्णयावर खूश आहेत आणि आता मुलगा आणि मुलगी दोघेही असल्यामुळे त्यांचे कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतं. झांग यांची ही कथा समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. काही लोक त्यांच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर काही जण इतक्या वयात आई बनण्यावरून आणि मुलांच्या संगोपनाबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.