न्यूयॉर्क : कोव्हिड महामारीच्या सुरुवातीला डॉक्टरांना वाटत होते की, हा विषाणू प्रामुख्याने श्वास घेण्यामध्ये अडचणी निर्माण करतो. मात्र कोरोना विषाणू किंवा कोव्हिड आजाराचा अन्यही अनेक अवयवांवर विपरीत परिणाम होतो हे कालौघात स्पष्ट होत गेले. अलीकडेच झालेल्या एका संशोधनात दिसून आले की, कोव्हिडचा मेंदूवरही प्रभाव पडतो. त्यामुळे स्वाद, गंध घेणे तसेच विचार करण्याच्या क्षमतेत घट होण्यापासून ते स्ट्रोक होण्यापर्यंतचे अनेक परिणाम दिसून येतात.
न्यूयॉर्कच्या 'लँगोन हेल्थ' या हॉस्पिटलने कोरोना विषाणूचा मेंदू व चेतासंस्थेवर होणार्या प्रभावाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी माहिती गोळा केली. त्याच्याशी निगडित प्रोग्रॅमचे संचालक डॉ. शेरॉन मेरोपोल यांनी सांगितले की, कोव्हिड रुग्णांच्या मेंदूत काय घडत आहे व त्याची हानी कशी बरी करता येईल, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वेंडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये मेंदू रोगावर संशोधन करणार्या डॉ. वेस एली यांचे म्हणणे आहे की, कोव्हिड दीर्घकाळ मेंदूच्या 'सपोर्ट सेल्स' किंवा सहायक पेशींवर हल्ला करू शकतो.
या अशा पेशी असतात ज्यांचे काम चेतापेशींद्वारे मेंदू आणि शरीराला सामान्य रूपाने कार्य करण्यासाठी सक्षम ठेवणे. एली यांनी सांगितले की, या सहायक पेशींची हानी झाल्याने चेन रिअॅक्शन (साखळी प्रतिक्रिया) सुरू होऊ शकते जी मेंदूतील ऊती म्हणजेच पेशींचे समूह नष्ट करू शकते. निश्चितपणे अनेक प्रक्रिया चालू आहेत. विषाणू थेट मेंदूलाही प्रभावित करू शकतो आणि रोगप्रतिकारक यंत्रणेत परिवर्तनाचे कारण बनतो. त्यामुळे मेंदूत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.