स्वप्नांवर नियंत्रणासाठी स्वतःच आपल्या मेंदूत केले इलेक्ट्रोड प्रत्यारोपण!

मॉस्को : ही दुनिया खरोखरच अजब आहे. जगाच्या पाठीवर अनेक लोक असे आहेत जे कधी, काय करतील हे काही सांगता येत नाही. आता रशियामधील एका वादग्रस्त वैज्ञानिकाने आपल्या लिव्हिंग रूममध्ये स्वत:चीच शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला आहे. आपल्याला पडणार्या स्वप्नांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याने मेंदूमध्ये एका इलेक्ट्रोडचे प्रत्यारोपण केल्याचा दावा केला आहे. या वैज्ञानिकाचे नाव मायकल रादुगा असे आहे. मायकल हे रशियामधील प्रसिद्ध संशोधक असले तरी त्यांच्याकडे न्यूरो सर्जरी करण्याइतकं शिक्षण नसल्याची माहिती समोर आली आहे. या संशोधकाने केलेल्या दाव्यानुसार, कझाकिस्तानमधील राहत्या घरीच त्यांनी स्वत:ची शस्त्रक्रिया केली.
यावेळेस आपल्या शरीरामधील एक लिटर रक्त वाया गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आपण पाहात असलेली स्वप्नं ही स्वप्नंच आहेत, याचं भान असेल तर अशा स्वप्नांना ‘ल्यूसिड ड्रीम्स’ असं म्हणतात. याच स्वप्नांवर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने मायकल यांनी ही शस्त्रक्रिया केल्याचं म्हटलं आहे.
मायकल रादुगा हे पेशाने डॉक्टर नाहीत. मात्र त्यांची फेज रिसर्च सेंटर नावाची संस्था आहे. मायकल हेच या संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेच्या दाव्यानुसार, कोणत्याही व्यक्तीला स्लीप पॅरालिसिस, झोपेत शरीरिकद़ृष्ट्या येणारे काही अनुभव यांसारख्या गोष्टींचे मार्गदर्शन मायकल करू शकतात. मायकल यांचा मोठा चाहता वर्ग रशियामध्ये आहे. मात्र अनेक न्यूरो सर्जन म्हणजेच चेतासंस्था आणि मेंदूसंदर्भात अभ्यास करणार्या डॉक्टरांनी मायकल हे फारच धोकादायक प्रयोग करत असल्याचा इशारा दिला आहे. ‘हे असं करणं फारच धोकादायक आहे’, अशी प्रतिक्रिया ऑक्सफर्ड विद्यापीठाचे सल्लागार न्यूरोसर्जन एलेक्स ग्रीन यांनी मायकल यांच्या प्रयोगाबद्दल बोलताना दिली आहे. ‘यात अनेक धोके आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर त्यांच्या नसेमध्ये किंवा इंट्रासेरेब्रल व्हेसलमध्ये (मेंदूमधील एक भाग) रक्तस्राव झाला असता तर तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असता’, असे ग्रीन यांनी म्हटले आहे.
मायकल यांनीही आपण या शस्त्रक्रियेच्या पहिल्या 30 मिनिटांनंतर माघार घेण्याची मानसिक तयारी केली होती असे सांगितले. सुरुवातीला आपल्या डोक्यामधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. जवळजवळ 1 लिटर रक्त वाहून गेल्याने आपण बेशुद्ध पडू की काय अशी भीती मायकल यांना वाटत होती. असे असतानाही मायकल यांनी ही शस्त्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा केला आहे. घरातच स्वत:वर शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मायकल यांनी आंघोळ केली. त्यानंतर ते 10 तास काम करत होते.