नासा संस्थेने शेअर केले भारतीय वंशाची श्रद्धावंत इंटर्नचे छायाचित्र | पुढारी

नासा संस्थेने शेअर केले भारतीय वंशाची श्रद्धावंत इंटर्नचे छायाचित्र

वॉशिंग्टन : नासा या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने भारतीय वंशाची इंटर्न प्रतिमा रॉय यांचे हिंदू देव-देवतांसह छायाचित्र शेअर केले आहे. विज्ञानाच्या क्षेत्रातही श्रद्धावान असलेले अनेक लोक आहेत. देश-विदेशातील अशा अनेक वैज्ञानिकांची लोकांना माहितीही आहे.

आता अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने भारतीय वंशाची इंटर्न प्रतिमा रॉय यांचे हिंदू देव-देवतांसह छायाचित्र शेअर केले आहे.

नासा संस्थेने इंटर्नशिपसाठी अर्ज मागवण्याच्या हेतूने एक ट्विट केले आहे. त्यामध्ये संस्थेने आपल्या इंटर्नची काही छायाचित्रेही शेअर केली आहेत.

या छायाचित्रांमध्ये प्रतिमा रॉय यांचेही हे छायाचित्र आहे. त्यामध्ये त्यांच्याजवळ देवी दुर्गा, सरस्वती व लक्ष्मी यांच्या मूर्ती तसेच शिव-पार्वतीची प्रतिमा दिसून येते. प्रतिमा यांच्या टी शर्टवर ‘नासा’चा लोगो असून त्यांच्याजवळील लॅपटॉपवरही ‘नासा’चा लोगो दिसून येतो. हा फोटो ‘नासा’ने शेअर केल्यावर अनेकांनी त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली.

भारतीय वंशाच्या प्रतिमा आणि पूजा रॉय या बहिणी नासा ग्लेन रिसर्च सेंटरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर को-ऑप इंटर्न आहेत. दोघी न्यूयॉर्क सिटी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अध्ययन करीत आहेत.

नासा संस्थेने एका ब्लॉगमध्ये दोघींना त्यांच्या अनुभवांबाबत विचारले. प्रतिमाने सांगितले की, आपला परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. इश्वरकृपेने आपली स्वप्ने साकार होतात, यावरही आपला विश्वास असल्याचे तिने म्हटले आहे.

Back to top button