द. कोरियात पांडाने दिला दोन पिल्लांना जन्म

सेऊल : जायंट पांडाचा प्रजनन दर अतिशय कमी असल्याने या प्रजातीमध्ये पिल्लाचा जन्म झाला की त्याकडे जगाचे लक्ष वेधले जात असते. विशेषतः मानवाच्या ताब्यात असलेल्या, प्राणीसंग्रहालयातील जायंट पांडाला पिल्ली झाली की तिथे जणू आनंदोत्सवच साजरा होत असतो. आता दक्षिण कोरियातील एका थीम पार्कमध्ये जायंट पांडाच्या मादीने दोन पिल्लांना जन्म दिला आहे.
पार्कच्या संचालकांनी सांगितले की सेऊलजवळील एव्हरलँड थीम पार्कमध्ये या जायंट पांडाने जुळ्या पिल्लांना जन्म दिला. ही मादी आणि तिची दोन्ही पिल्ली ठणठणीत आहेत. ही प्रजाती नामशेष होऊ नये यासाठी गेल्या अनेक दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सध्या या पांडांची संख्या एक हजारवरून 1800 वर जाऊन पोहोचली आहे. जंगलात राहणारे पांडा सुमारे पंधरा वर्षे जगतात. मात्र, मानवाच्या ताब्यात असलेले पांडा 38 वर्षेही जगतात. एव्हरलँड थीम पार्कमधील या मादीचे नाव ‘अई बाओ’ असे असून तिच्या जोडीदार नराचे नाव ‘ले बाओ’ असे आहे. त्यांना 2016 मध्ये चीनमधून आणण्यात आले होते. ‘अई बाओ’ने यापूर्वी 2020 मध्ये ‘फू बाओ’ नावाच्या मादीला जन्म दिला होता.