अतिथंड तार्‍यापासून निघतात चक्क रेडिओ लहरी | पुढारी

अतिथंड तार्‍यापासून निघतात चक्क रेडिओ लहरी

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी आता एक अनोखा व ‘अतिथंड’ असा तारा शोधून काढला आहे. या तार्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे तो नियमितपणे रेडिओ वेव्ह पल्सेस उत्सर्जित करीत असतो. विशेष म्हणजे या तार्‍याचे स्वतःचे चुंबकीय क्षेत्र आहे. असे चुंबकीय क्षेत्र असताना एखादा तारा रेडिओ लहरींची निर्मिती करू शकत नाही. मात्र, हा तारा आश्चर्यकारकरीत्या अशा रेडियो लहरी निर्माण करून त्या उत्सर्जित करतो.

या तार्‍याने ग्रह आणि तारा यांच्यामधील सीमारेषा जणू काही धुसर केली आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे. छोटे तारे कसे विकसित होतात हे जाणून घेण्यासाठीही या तार्‍याचे निरीक्षण उपयोगी ठरू शकते. या तपकिरी, खुजा तार्‍याला ‘टी 8 ड्वॉर्फ वाईज जे062309.94-045624.6 (डब्ल्यू0623) असे नाव देण्यात आले आहे. अशा प्रकारच्या ‘प्रोटोस्टार’ मध्ये गुरू ग्रहासारख्या वायुरूप महाकाय ग्रहांसारखी संरचना असते. बहुतांश तार्‍यांच्या कोअरमध्ये न्यूक्लिअर फ्यूजनची प्रक्रिया घडत असते.

मात्र, अशा तार्‍यांमध्ये पूर्ण स्वरूपात अशी एकत्रिकरणाची प्रक्रिया घडत नाही. मात्र, तरीही असे तारे हायड्रोजनच्या अणूंना ‘फ्यूज’ करू शकतात. हा तारा पृथ्वीपासून 37 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. एखाद्या सामान्य तार्‍याच्या तुलनेत त्याच्या पृष्ठभागाचे तापमान अतिशय कमी म्हणजे सुमारे 425 अंश सेल्सिअस इतके आहे.

Back to top button