तब्बल 85 हजार रुपयांची भाजी! | पुढारी

तब्बल 85 हजार रुपयांची भाजी!

नवी दिल्ली : सध्या आपण टोमॅटोच्या व अन्यही काही भाज्यांच्या वाढलेल्या दरांमुळे त्रस्त आहोत. अशा स्थितीत एक भाजी अशी आहे जिची किंमत आपले डोळे विस्फारू शकते. युरोपियन देशांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली आणि ‘जगातील सर्वात महाग भाजी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या भाजीचे नाव आहे ‘हॉपशूटस्’. ही भाजी इतकी महाग असण्याचे कारण म्हणजे या हॉपशूटस्मध्ये अनेक औषधी गुणधर्म भरपूर आहेत. या भाजीची किंमत सुमारे 85 हजार रुपये किलो असून भारतात या भाजीची लागवड सहसा केली जात नाही. अनेक मीडिया रिपोर्टस्नुसार, सर्वात आधी हिमाचल प्रदेशच्या शेतात याची लागवड करण्यात आली होती.

एका अहवालानुसार, हॉप शूटस् कापणीसाठी ‘बॅक-ब्रेकिंग’ आहेत आणि हेच एकमेव कारण आहे की हॉपशूटस्ची किंमत इतकी महाग आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेतील मूळच्या लोकांनी जगातील सर्वात महागड्या भाजीची लागवड करण्यास सुरुवात केली. ही वनस्पती मध्यम गतीने 6 मीटर (19 फूट 8 इंच) पर्यंत वाढू शकते आणि सुमारे 20 वर्षे जगू शकते. हॉपशूटला कापणीसाठी तयार होण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागतो. या वनस्पतीची कापणी करण्यासाठी बरेच शारीरिक श्रमही करावे लागतात, कारण वनस्पतीच्या लहान हिरव्या टोकांना तोडताना अतिशय काळजी घेणे आवश्यक असते. वैद्यकीय अभ्यासानुसार, असे सूचित केले गेले आहे की ही भाजी क्षयरोगाविरुद्ध अँटीबॉडी बनवू शकते तसेच चिंता, निद्रानाश, अस्वस्थता, तणाव, अटेंशन डेफिसिट-हाइपरएक्टिविटी डिसऑर्डर अशा विविध समस्यांवर मदत करते. या भाजीचा वापर मद्य, हर्बल चहा, हर्बल औषधे, शीतपेये अशा वेगवेगळ्या उत्पादनांसाठी केला जात असतो.

Back to top button