पृथ्वीवरील सर्वात नवा ज्वालामुखी! | पुढारी

पृथ्वीवरील सर्वात नवा ज्वालामुखी!

लंडन : आईसलँडच्या रेकजान्स पेनिन्सुलामध्ये जमिनीतून उकळत्या लाव्हा रसाचा उद्रेक होत आहे. हा पृथ्वीवरील सर्वात नवा ज्वालामुखी ठरला आहे. आईसलँडच्या फॅग्राडल्सजॉल परिसरात नवा ज्वालामुखी तयार होण्याची ही सलग तिसर्‍या वर्षीची घटना आहे. सोमवारी येथील 1.7 मैल लांबीच्या भागातून लाव्हा रस उसळून बाहेर पडू लागला. हा लाव्हा अद्यापही दक्षिणेकडे वाहत चालला आहे. याच भागात गेल्या वेळेचा ज्वालामुखी उद्रेक झाला होता.

अनेक दिवसांच्या भूगर्भीय हालचालींनंतर 10 जूनला हा उद्रेक झाला. या भागात संशोधकांनी 4 जुलैपासून भूकंपाचे 7 हजारांपेक्षाही अधिक धक्के नोंदवले होते. त्यापैकी सर्वात मोठा धक्का 4.8 रिश्टर स्केलचा होता. आता या भागात 1.7 मैल म्हणजेच 2.7 किलोमीटर लांबीची भेग निर्माण झाली असून त्यामधून हा लाव्हा बाहेर येत आहे.

हा लाव्हा दक्षिणेकडील दरीकडे वाहत चालला आहे. हा सर्व परिसर निर्जन असल्यामुळे जीवित किंवा मालमत्तेच्या हानीचा धोका नाही. हा लाव्हा वाहत छोट्या दरीतून बाहेर आला तर तो मेरारडॅलिर दरीत जाऊन पोहोचेल. याच ठिकाणी 3 ऑगस्ट 2022 मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.

Back to top button