कर्करोगावरील औषधांच्या चाचणीसाठी ‘पारदर्शक उंदीर’! | पुढारी

कर्करोगावरील औषधांच्या चाचणीसाठी ‘पारदर्शक उंदीर’!

लंडन : पारदर्शक उंदीर कधी पाहिला आहे का? अर्थातच निसर्गाने असा उंदीर बनवलेला नाही. मात्र, संशोधकांनी उंदराला पारदर्शक बनवण्याचे तंत्र शोधलेले आहे. एखाद्या मृत उंदराच्या देहाला असे पारदर्शक बनवता येते. आता अशा पारदर्शक उंदरांचा वापर कर्करोगावरील औषधांच्या चाचणीसाठी केला जाणार आहे. औषधांचा विशिष्ट ट्यूमरवर कसा परिणाम होतो हे यामधून पाहणे सोपे होणार आहे. त्यासाठी प्रचलित स्कॅनिंग पद्धतीची आवश्यकता राहणार नाही.

वेगवेगळ्या औषधांच्या चाचण्या या आधी उंदरांवरच घेतल्या जात असतात. हेल्महोल्झ म्युनिक रिसर्च सेंटरमधील प्रा. अली इटुर्क यांनी एखाद्या मृत उंदराला पारदर्शक कसे बनवायचे याचे तंत्र 2018 मध्ये शोधले होते. आता त्यांच्या टीमने अशा उंदरांच्या शरीरातील विशिष्ट ऊती म्हणजेच पेशींचा समूह ठळकपणे दिसण्यासाठी रसायनांचा वापर करण्याचेही तंत्र शोधले आहे. इंग्लंडमधील संशोधकांना असे उंदीर कर्करोगाच्या औषधांच्या चाचण्या घेण्यासाठी योग्य वाटतात. त्यामधून अतिशय बारीक तपशीलही समोर येऊ शकतात, जे सध्याच्या स्कॅनिंग पद्धतीमधून समोर येत नाहीत.

कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यातील ट्यूमरवर या पद्धतीने चाचणी घेण्यात आली आहे. प्रा. इरटुर्क यांनी सांगितले की एमआरआय आणि पेट स्कॅनमधून केवळ मोठ्या ट्यूमरचा छडा लागतो. आमच्या पद्धतीत अगदी एका पेशीच्या सूक्ष्म ट्यूमरलाही शोधता येऊ शकते. एरव्ही प्रयोगशाळेतील उंदरामध्ये कर्करोग निर्माण करून त्याच्या शरीरातील ट्यूमरचा विकास स्कॅनिंगद्वारे तपासला जात असतो. त्यानंतर त्यांच्यावर कर्करोगाच्या औषधांचा प्रयोग करून त्याचे परिणाम तपासले जात असतात. आता हे सर्व पारदर्शक उंदरांच्या माध्यमातून सोपे होऊ शकते.

संबंधित बातम्या
Back to top button