जेम्स वेब टेलिस्कोपने टिपली शनीची सुंदर प्रतिमा | पुढारी

जेम्स वेब टेलिस्कोपने टिपली शनीची सुंदर प्रतिमा

वॉशिंग्टन : जेम्स वेब टेलिस्कोपने आपल्या लाँचिंगनंतर सातत्याने सुंदर छायाचित्रे टिपली आहेत व नवे शोध लावले आहेत. सखोल अंतराळातील अनेक द़ृश्ये या अंतराळ दुर्बिणीने टिपून घेतलेली आहेत. आपल्या सौरमंडळातीलही अनेक छायाचित्रे ही दुर्बीण टिपत असते. आता तिने शनी ग्रहाचे एक सुंदर छायाचित्र टिपले आहे. त्यामध्ये शनीची कडी चमकत असताना दिसून येते. शनी ग्रहाची अतिशय तपशील टिपणारी ही प्रतिमा पाहून खगोलशास्त्रज्ञही चकीत झाले आहेत.

‘नासा’ने याबाबतची माहिती दिली आहे. या छायाचित्रात दिसते की शनी ग्रह हा त्याच्या कडीपेक्षा हलक्या रंगाचा दिसून येतो. हे मिथेन वायूमुळे घडत असते. शनी ग्रहाचा मिथेन वायू सूर्यप्रकाश शोषून घेतो. मात्र, त्याची कडी चमकदार आहे जी अतिशय सुंदर दिसत आहे. या छायाचित्रातच शनीचे डायोन, एन्सिलाडस आणि टेथिस हे चंद्रही डाव्या बाजूस दिसत आहेत. तसेच कॅसिनी डिव्हिजन, एन्के गॅप आणि रिंग ए, बी, सी व एफ उजवीकडे दिसत आहे. ‘नासा’ने म्हटले आहे की जेम्स वेब दुर्बिणीने टिपलेले हे शनीचे पहिलेच छायाचित्र आहे. सध्या जेम्स वेब टेलिस्कोप पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर अंतराळात आहे. ही दुर्बिणी आतापर्यंत बनलेल्या दुर्बिणींपेक्षा अधिक सरस असून ती इन्फ्रारेड प्रकाशही पाहू शकते. हे छायाचित्र जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या नियर इन्फ्रारेड कॅमेर्‍यातून टिपण्यात आले आहे. शनी व त्याच्या चंद्रांचा अभ्यास करण्यासाठी हे छायाचित्र उपयुक्त ठरू शकते.

संबंधित बातम्या
Back to top button