न्यूयॉर्क : जत्रेतील पाळण्यांपासून अॅम्युझमेंट पार्कमधील विविध रोलर कॉस्टरपर्यंत अनेक राईडस्ची हौस लोकांना असते. केवळ लहान मुलांनाच नव्हे तर प्रौढांनाही अशा रोलरकॉस्टरमध्ये बसण्याची आवड असते. मात्र, कधी कधी ही आवड धोकादायकही ठरू शकते. असाच एक प्रकार अमेरिकेत घडला आहे. तिथे एक रोलरकॉस्टर उलटी जात असताना मध्येच अडकली आणि बसलेल्या पंधराजणांची अवस्था खाली डोके, वर पाय अशी 'शीर्षासना'सारखी झाली! यामध्ये सात मुलं आणि आठ प्रौढांचा समावेश होता.
यासंदर्भातील व्हिडीओ एका अकाऊंटवरून ट्विट करण्यात आला आहे. त्यामध्ये दिसते की रोलर कोस्टर राईड सुरू असताना अचानक एका सर्कलवर रोलर कोस्टर बंद पडतो. हा रोलर कोस्टर बंद पडला तेव्हा तो एका गोलाकार मार्गावर होता जिथे रोलर कोस्टरमधील लोक हे जमिनीकडे डोकं करून उलट्या अवस्थेत होते. याच अवस्थेत रोलर कोस्टर बंद पडल्याने हे सर्वजण आहे ते स्थितीत अडकून पडले. हा संपूर्ण प्रकार रविवारी फॉरोस्ट काऊंटी फेस्टिव्हलदरम्यान विस्कॉन्सिंन येथील कॅडन येथे घडला. 'खाली डोकं वर पाय' या अवस्थेत हे लोक 3 तास अडकून होते अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. अडकलेल्यांमध्ये 7 लहान मुलं आणि 8 व्यक्तींचा समावेश होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये हवेत उलट्या अवस्थेत लटकलेले हे 15 लोक दिसत आहेत. हा व्हिडीओ 43 सेकंदांचा आहे. अनेक सोशल नेटवर्किंग साईटस्वर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 3 तासांहून अधिक काळ प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना या अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका करता आली. हे लोक उलट्या अवस्थेत अडकल्याने त्यांची सुटका करण्यासाठी अधिक वेळ लागला. मुलांना 3 तासांनी खाली उतरवण्यात आले तेव्हा ती फार घाबरलेली होते. तांत्रिक गोंधळामुळे रोलर कोस्टर अडकल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी नेमके काय घडलं याचा तपास सुरू करण्यात आला आहे.