टपाल तिकीट : या जगातील पहिल्या तिकिटाची किंमत ६१ कोटी रुपये! | पुढारी

टपाल तिकीट : या जगातील पहिल्या तिकिटाची किंमत ६१ कोटी रुपये!

लंडन : जगातील पहिले चिकटवले जाणारे टपाल तिकीट ‘पेनी ब्लॅक’चा 7 डिसेंबरला लंडनमध्ये लिलाव केला जाणार आहे. जगातील सर्वात जुने लिलाव केंद्र सोथबीकडून हा लिलाव होईल. ‘पेन ब्लॅक’ची किंमत सध्या 61 कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. या तिकिटावर महाराणी व्हिक्टोरियाचे छायाचित्र असून ते राणी पंधरा वर्षांची असताना टिपण्यात आले होते. कालांतराने ‘पेनी ब्लॅक’ बंद करून ‘पेनी रेड’ तिकीट जारी करण्यात आले होते.

महाराणी अ‍ॅलेक्झांड्रिना व्हिक्टोरियाचा जन्म सन 1819 मध्ये किनजिंग्टन पॅलेसमध्ये झाला. या महाराणीला केवळ व्हिक्टोरिया किंवा निकनेम ड्रिना या नावाने संबोधून घेणे आवडत असे. तीन चुलते आणि वडिलांनंतर ती ब्रिटिश राजसिंहासनाची पाचव्या क्रमांकाची उत्तराधिकारी होती. मात्र, या सर्व वारसदारांचा मृत्यू झाल्यामुळे सन 1837 मध्ये व्हिक्टोरिया ब्रिटिश राजसिंहासनावर आली.

सन 1839 मध्ये व्हिक्टोरियाने गोथाचा राजकुमार अल्बर्टसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि एक वर्षानंतर दोघांनी विवाह केला. या दाम्पत्याला नऊ अपत्ये झाली. व्हिक्टोरिया ही अशी पहिली व्यक्ती होती जिच्यामध्ये ‘शाही आजार’ ब्लड क्लॉटिंग हिमोफिलिया बीचे निदान झाले. व्हिक्टोरिया एक कर्तबगार राणी होती. ती अनेक भाषांची जाणकारही होती. इंग्रजी व जर्मनशिवाय तिला फे्रंच, इटालियन, लॅटिन भाषा येत होत्या.

तसेच हिंदी व उर्दूचेही तिने आपला सेवक अब्दुल करीमकडून काही धडे घेतले होते. या राणीला ठार मारण्याचा आठवेळा प्रयत्न झाला होता; पण सुदैवाने ती बचावली. तिच्यामुळेच जगभर ‘व्हिक्टोरिया’ हे नावही प्रसिद्ध झाले. या राणीचा किशोरवयातील फोटो पहिल्या टपाल तिकिटावर लावण्यात आला होता.

Back to top button