पोपटांचे बेट’ म्हणून ओळखले जाणारेही एक बेट भारतात | पुढारी

पोपटांचे बेट’ म्हणून ओळखले जाणारेही एक बेट भारतात

नवी दिल्ली : जगभरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण बेटं आढळतात. एका बेटावर सापांचे साम्राज्य आहे तर एकावर सशांचे. एक बेट झाडाला टांगलेल्या अनेक बाहुल्यांमुळे ओळखले जाते तर एका बेटावर मोठ्या संख्येने लाल खेकडे पाहायला मिळतात. मात्र, ‘पोपटांचे बेट’ म्हणून ओळखले जाणारेही एक बेट आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? हो, असे एक बेट आहे आणि ते आपल्याच देशात आहे!

अंदमान-निकोबार बेट समूहांमध्येच या बेटाचा समावेश असून तिथे मोठ्या संख्येने पोपट पाहायला मिळतात. या बेटावर खारफुटीची मोठी झाडी असून बेटावरील खार्‍या पाण्यात अनेक मगरी आहेत. बेटावर जाण्यासाठी निश्चित वाहतूक सुविधा नाही. तिथे जाण्यासाठी खास बोट घ्यावी लागते.

मात्र, या बेटावर जाणे ही पक्षीप्रेमींसाठी किंवा पक्षीनिरीक्षकांसाठी पर्वणी ठरू शकते. बरतांग जेट्टीपासून याठिकाणी जाण्यासाठी बोट मिळते. अर्ध्या तासाच्या सागरी प्रवासानंतर या पोपटांच्या बेटावर पोहोचता येते. स्थानिक बरतांग लोकांच्या म्हणण्यानुसार पाच पोपटांचा एक समूह रोज सायंकाळी याठिकाणी येतो व परिसराचे निरीक्षण करतो.

त्यानंतर शेकडो पोपट या बेटावर येतात आणि रात्री मुक्काम करतात. रंगीबेरंगी पॅराकिटस्ही याठिकाणी मोठ्या संख्येने येतात. या पोपटांमुळेच बेटाला ‘पोपटांचे बेट’ असे नाव पडले. हे सर्व पोपट सकाळ होताच उडून जातात.

Back to top button