वॉशिंग्टन : पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक अंतराळवीर राहून वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करीत असतात. चीननेही स्वतःचे एक वेगळे अंतराळ स्थानक निर्माण केलेले आहे. भविष्यात रशियाही स्वतःचे वेगळे अंतराळस्थानक बनवू शकते असे चित्र आहे. आता अंतराळ संशोधन क्षेत्रातील बड्या खासगी कंपन्यांपैकी 'ब्लू ओरिजिन' या कंपनीचे मालक तसेच 'अॅमेझॉन'चे संस्थापक जेफ बेजोस यांनीही अंतराळस्थानक बनवण्याची योजना आखली आहे.
बेजोस यांनी नुकतेच जाहीर केले की ते स्वतःचे स्पेस स्टेशन लाँच करणार आहेत. या अंतराळस्थानकावर दहा अंतराळवीरांना राहता येईल. 2025 नंतर हे स्पेस स्टेशन कधीही लाँच होऊ शकते. सध्या अंतराळ संशोधन क्षेत्रात विविध देशांचीच नव्हे तर खासगी कंपन्यांचीही मोठी स्पर्धा सुरू आहे.
अशा वेळीच जेफ बेजोस यांनी या स्पेस स्टेशनची घोषणा केली आहे. त्यांनी या स्पेस स्टेशनला 'ऑर्बिटल रीफ' असे नाव दिले आहे. हे अंतराळातील बिझनेस पार्कसारखे असेल. मायक्रोग्रॅव्हिटी रिसर्च म्हणजेच कमी किंवा शून्य गुरुत्वाकर्षण स्थितीमधील वेगवेगळी वैज्ञानिक संशोधने करण्यासाठी तसेच अन्य प्रकारच्या संशोधनांसाठीही हे स्पेस स्टेशन वापरले जाईल.
'ब्लू ओरिजिन'चे एक प्रमुख अधिकारी ब्रेंट शेरवूड यांनी म्हटले की गेल्या साठ वर्षांमध्ये 'नासा' आणि अन्य स्पेस एजन्सींनी ऑर्बिटल स्पेस फ्लाईट आणि अंतराळात राहण्यासाठी ठिकाण निर्माण केले आहे. या दशकात आम्ही व्यावसायिक स्थानक निर्माण करू. बेजोस यांचे हे 'ऑर्बिटल रीफ' पृथ्वीपासून 500 किलोमीटर उंचीवर असेल.
ते आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकापेक्षा थोडे अधिक उंचीवर असेल. यामध्ये राहणारे अंतराळवीर चोवीस तासांमध्ये 32 सूर्योदय आणि सूर्यास्त पाहू शकतील. या स्थानकावर अनेक मोठ्या आकाराच्या खिडक्या असतील. आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकाची 2011 मध्ये निर्मिती झाली होती. त्याच्यापेक्षा या स्थानकामध्ये अधिक लोक राहू शकतील.