आकाशगंगेबाहेरील पहिल्या ग्रहाचा शोध? | पुढारी

आकाशगंगेबाहेरील पहिल्या ग्रहाचा शोध?

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी आतापर्यंत ‘हबल’सारख्या अंतराळ दुर्बिणीच्या व अन्यही वेधशाळांच्या मदतीने आपल्या सौरमालिकेबाहेरील अनेक ग्रहांचा शोध लावला आहे. हे सर्व बाह्यग्रह आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेमधीलच आहेत. मात्र, आता ‘नासा’ या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने अशा ग्रहाचा शोध लावला आहे जो कदाचित आपल्या आकाशगंगेबाहेरील शोध लावलेला पहिला ग्रह ठरू शकतो.

आतापर्यंत सुमारे पाच हजार बाह्यग्रहांना शोधण्यात आले आहे. मात्र, हे सर्व ग्रह आपल्या ‘मिल्की वे’ या आकाशगंगेतच स्थित आहेत. मात्र, ‘नासा’ने आता ज्या ग्रहाचा शोध लावला आहे तो आपल्या आकाशगंगेपासून 2 कोटी 80 लाख प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या ‘मेसियर 51’ या आकाशगंगेत आहे. त्याला चंद्र एक्स-रे टेलिस्कोपच्या सहाय्याने शोधण्यात आले आहे.

या ग्रहाचा शोध ट्रांझिटच्या आधारे घेण्यात आला. एका तार्‍याच्या पार्श्वभूमीवरून तो पुढे जात असताना त्याला पाहण्यात आले. अशा ट्रांझिट स्थितीत असतानाच अधिक प्रमाणातील चमक असल्याने त्याचा इतक्या दीर्घ अंतरावरूनही पृथ्वीवरून छडा लावण्यात आला. हजारोंच्या संख्येने बाह्यग्रह शोधत असताना या पद्धतीचा अनेकवेळा उपयोग करण्यात आलेला आहे.

डॉ. रोसॅन डी स्टेफानो आणि त्यांच्या सहकार्‍यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. या ग्रहाचा शोध लावणार्‍या संशोधकांनी म्हटले आहे की आपण आकाशगंगेबाहेरील पहिल्याच ग्रहाचा शोध लावला असला तरी या दाव्याची पुष्टी करण्यासाठी आणखी डेटाची गरज आहे.

Back to top button