टार्गेट पूर्ण न केल्याने कच्ची कारली खाण्याची शिक्षा! | पुढारी

टार्गेट पूर्ण न केल्याने कच्ची कारली खाण्याची शिक्षा!

जियांग्शू : कंपनी कोणतीही असो, आपल्या कर्मचार्‍यांकडून काम करवून घेण्यासाठी ‘रिवॉर्ड अँड पनिशमेंट पॉलिसी’ अवलंबत असते. जर काम वेळेत, व्यवस्थित होत असेल तर बक्षीस दिले जाते आणि जर काम होत नसेल तर त्याची शिक्षाही दिली जाते. चीनमधील कॉर्पोरेट क्षेत्रात मात्र असे अफलातून प्रकार होतात, ज्यावर विश्वास ठेवणेही कठीण असते. चीनमध्ये आतापर्यंत शिक्षा देण्याचे असे एकापेक्षा एक अजब प्रकार समोर आले आहेत, ज्यात काहीवेळा एकमेकांना थप्पड देण्याची शिक्षा दिली जाते किंवा अगदी कुत्र्याप्रमाणे गळ्यात पट्टा घालून चालवण्याचेही प्रकार घडले आहेत.

तूर्तास, चीनमधील जियांग्शू प्रांतातील असा प्रकार उघडकीस आला आहे, ज्यात सुझो डॅनो फँगशेंग्शी कन्सल्टिंग कंपनीने आपल्या डझनभर कर्मचार्‍यांना दिरंगाईमुळे चक्क कच्ची कारली खाण्याची शिक्षा सुनावली. आणखी भरीस भर म्हणून हे कर्मचारी कच्चे कारले खात असतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल केला. सदर शिक्षा मान्य असल्याचे या कर्मचार्‍यांनी कबूल केले होते, असे या कंपनीचा दावा आहे. आता हा दावा खरा असेल वा नसेलही; पण त्या कच्च्या कारल्याची चव त्या कर्मचार्‍यांच्या जीभेवर अद्याप रेंगाळत असेल, याबाबत साशंकता नको!

Back to top button