‘क्युरिऑसिटी’ने टिपले मंगळभूमीचे सुंदर छायाचित्र | पुढारी

‘क्युरिऑसिटी’ने टिपले मंगळभूमीचे सुंदर छायाचित्र

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या ‘क्युरिऑसिटी’ या रोव्हरने मंगळाच्या भूद़ृश्याचे सुंदर ‘पोस्टकार्ड’ छायाचित्र टिपले आहे. सकाळ ते दुपारच्या काळातील सूर्यप्रकाश आणि जमिनीवरील अनेक तपशील टिपणारे हे सुंदर छायाचित्र आहे. ‘क्युरिऑसिटी’च्या ‘ब्रेन बुस्टिंग नॅप’ म्हणजेच ‘मेंदू’ तजेलदार होण्यासाठी घेतलेल्या ‘डुलकी’नंतर हे छायाचित्र टिपून पृथ्वीवर पाठवण्यात आले आहे.

क्युरिऑसिटी रोव्हरने त्याच्या मोहिमेच्या ‘सोल 3,794’ या मंगळदिवसाच्या किंवा पृथ्वीवरील 8 एप्रिल या दिवशी हे छायाचित्र टिपले होते. मार्कर बँड व्हॅली असे नाव दिलेली दरी सोडल्यानंतर लवकरच हे छायाचित्र टिपण्यात आले. याच दरीमध्ये 2022 मध्ये ‘क्युरिऑसिटी’ने एका प्राचीन सरोवराच्या खुणा शोधल्या होत्या.

‘क्युरिऑसिटी’ने हे छायाचित्र टिपण्यापूर्वी जणू काही एक ‘डुलकी’ काढली होती. 3 एप्रिल ते 7 एप्रिल या काळात त्याच्या सॉफ्टवेअरच्या अपडेटचे काम सुरू होते. ते पूर्ण झाल्यावर पुन्हा सक्रिय झालेल्या रोव्हरने हे सुंदर छायाचित्र टिपले व ते पृथ्वीवर पाठवले. हा नवा ‘पॅनोरामा’ म्हणजे दोन छायाचित्रांचा मिलाफ आहे. एक सकाळचे असून दुसरे दुपारचे आहे. या दोन्ही काळातील सूर्यप्रकाशाचाही मिलाफ घडवण्यात आला आहे.

Back to top button