केवळ तीन शब्दांत दिला राजीनामा! | पुढारी

केवळ तीन शब्दांत दिला राजीनामा!

लंडन : सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक भन्नाट प्रकार जगासमोर येत असतात. रजेचा अर्ज, नोकरीसाठीचा अर्ज किंवा अगदी राजीनामाही लिहिण्याच्या काही लोकांच्या तर्‍हा पाहिल्या की लोकांना हसू आवरत नाही. आता केवळ तीनच शब्दांमध्ये दिलेल्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

नोकरीसाठी अर्ज करायचा असेल किंवा अगदी राजीनामाही द्यायचा असेल तर त्याचा एक ‘फॉर्मल’ प्रकार असतो. अनेक लोक ऑफिसने किंवा संबंधित कंपनी, संस्थेने आपल्याला काय दिले, तिथे काय शिकायला मिळाले, आपण कोणते योगदान दिले असे लिहून पुढे आपण नवी सुरुवात करणार असल्याने राजीनामा देत आहोत वगैरे लिहित असतात.

मात्र, एका कर्मचार्‍याने अधिक पाल्हाळ न लावता केवळ तीनच शब्दांत बॉसला आणि कंपनीला रामराम ठोकला! हे तीन शब्द म्हणजे ‘बाय बाय सर’. याशिवाय या माणसाने अन्य काहीही लिहिलेले नाही. अर्थातच हे राजीनामा पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले. कंपनी किंवा बॉसला निरोप देत असताना या कर्मचार्‍याला झालेला आनंद त्यामधून स्पष्ट दिसतो. ट्विटरवर हे राजीनामा पत्र शेअर करण्यात आले आणि या ट्विटला तीन लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केले तर 51 हजार लोकांनी ते रिट्विट केले. हजारो लोकांनी यावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

Back to top button