कृत्रिम रीफपासून सागरी जलचरांना धोकाच! | पुढारी

कृत्रिम रीफपासून सागरी जलचरांना धोकाच!

वॉशिंग्टन : समुद्रांची दुनिया ही खरोखरच ‘न्यारी’ असते. या दुनियेतील जलचरांची सृष्टी वाचविण्यासाठी अमेरिकेने 1970-80 च्या दशकात फ्लोरिडाच्या समुद्रात कृत्रिम रीफ किंवा पाण्याखालचे खडक बनवले होते. प्रवाळरांगांच्या विकासासाठी ते उपयुक्त ठरेल असा होरा होता. हे आटिफिशियल रीफ आता पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहेत.

या आर्टिफिशियल रीफला ‘ऑस्बोर्न रीफ’ असे नाव देण्यात आले होते. ते बनवण्यासाठी 49 वर्षांपूर्वी लाखो खराब टायर्स समुद्रात फेकण्यात आल्या होत्या. आता काळाच्या ओघात या टायर सडत असून त्यापासून बाहेर पडणारी रसायने पाण्यात फैलावत आहेत. त्यापासून समुद्रातील माशांच्या 500 प्रजाती आणि अन्य जीवांनाही धोका निर्माण झाला आहे.

हा धोका इतका वाढला आहे की आता सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांच्या साथीने अमेरिकेचे सैन्यदलही या टायर्स बाहेर काढत आहेत. ‘द कूल डाऊन’च्या रिपोर्टनुसार अमेरिकन सैन्याने 2007 मध्ये समुद्रतळ साफ करण्याचे काम सुरू केले होते. 2015 मध्ये एका खासगी कंपनीने या प्रकल्पाची जबाबदारी घेतली होती. अजूनही तिथे पाच लाखांपेक्षाही अधिक टायर आहेत.

फ्लोरिडाच्या किनारपट्टीजवळ, फोर्ट लॉडरडेलमध्ये मच्छीमारांच्या एका समूहाने या भागात अधिकाधिक संख्येने मासे यावेत यासाठी अशा आर्टिफिशियल रीफची कल्पना मांडली होती. या भागात असे वातावरण बनवले जावे की अधिकाधिक संख्येने इथे मासे यावेत असे त्यांना वाटत होते. त्यासाठी अमेरिकन सरकारशी चर्चा करण्यात आली आणि ‘ऑस्बॉर्न रीफ’ बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे 1974 मध्ये या योजनेला अमेरिकन सैन्याच्या ‘कोअर ऑफ इंजिनिअर्स’नी मान्यता दिली होती. डंपिंग ऑपरेशन अमेरिकन नौदलाच्या माइनस्वीपरच्या देखरेखीखाली राबवण्यात आले. त्यावेळी सुमारे वीस लाख टायर्स समुद्रात फेकण्यात आल्या होत्या.

Back to top button