आठ वर्षांचा मुलगा करतो पुनर्जन्माचा दावा | पुढारी

आठ वर्षांचा मुलगा करतो पुनर्जन्माचा दावा

लखनौ : भारतात उदयास आलेल्या अनेक धर्मांमध्ये पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत मानला जातो. अर्थात नवा जन्म झाला की जुन्या जन्मामधील स्मृतीवर पडदा पडतो असेही मानले जाते. मात्र, काही वेळा पूर्वजन्मातील आठवणीही काही लोकांना आठवतात असे सांगतात. अनेक कथा-कादंबर्‍या व चित्रपटांमध्येही तसे विषय येऊन गेलेले आहेत. जगाच्या पाठीवर अनेक मुलांनी आपल्या पूर्वीच्या जन्मीच्या थक्क करणार्‍या आठवणीही सांगितल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दाव्यांमध्ये कितपत तथ्य असते हे कळण्यास मार्ग नाही; पण अशा घटना लोकांचे लक्ष वेधून घेतात. आता उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील एका व्हायरल व्हिडीओने लोकांना असेच आश्चर्यचकीत केले आहे.

व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा दावा करत आहे की, तो 8 वर्षांपूर्वी सर्पदंशामुळे मरण पावला होता. तसेच त्याचे नाव मनोज होते. त्याचा स्वतःच्या मुलीच्या पोटी पुनर्जन्म झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरी जागीरच्या रतनपूर गावातील आहे. याठिकाणी हा मुलगा आता आपल्या आजीला बायको असल्याचे सांगत आहे तर आपल्या आईला आपली मुलगी म्हणत आहे. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून लोकांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे. 9 जानेवारी 2015 रोजी रतनपूरचे रहिवासी मनोज मिश्रा हे त्यांच्या शेतात काम करत असताना त्यांना साप चावला. त्यानंतर त्यांची द़ृष्टी गेली.

कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यावेळी त्यांची मुलगी रंजनाही गरोदर होती. तर मनोज मिश्रा यांचे तेरावे होण्याआधीच त्यांची मुलगी रंजना हिने रंजनाने एका मुलाला जन्म दिला. यानंतर त्याचे नाव आर्यन ठेवण्यात आले. आश्चर्याची म्हणजे जेव्हा आर्यन त्याच्या आईसोबत मैनपुरीला आला आणि त्याने त्याच्या पुनर्जन्माची कहाणी आपल्या कुटुंबीयांना सांगितली. जेव्हा आर्यनने त्याच्या आजोबांच्या बँकेत जमा केलेल्या पैशाबद्दल नेमकी माहिती सांगितली तेव्हा लोकांना अधिक आश्चर्य वाटले. तर आर्यन त्याच्या दोन्ही मामांना आपला मुलगा असल्याचे सांगत आहे. यामध्ये एका मुलाचे नाव अनुज आणि दुसर्‍या मुलाचे नाव अजय आहे. दरम्यान, या घटनेची परिसरात मोठी चर्चा होत आहे.

Back to top button