बीजिंग : बर्याच वेळा काही लोक विशिष्ट भाषेचा वापर 'सांकेतिक भाषा' म्हणूनही करतात. आजुबाजूच्या लोकांना आपण काय व कुणाबद्दल बोलत आहे हे समजू नये म्हणून असा प्रकार केला जातो. चीनमध्ये तर एक भाषा अशी आहे जी केवळ महिलांनाच समजते. हुनान प्रांतातील या भाषेला 'नुशू' असे नाव आहे आणि ही सांकेतिक भाषा शेकडो वर्षांपासून महिलांनी सांभाळून ठेवली आहे. पुरुषी वर्चस्वाच्या काळात ही अनोखी भाषा व तिची लिपी विकसित झाली.
मध्य चीनमधील एका दुर्गम भागात ही भाषा बोलली जाते. विशेष म्हणजे शेकडो वर्षांपासून ही भाषा महिलांनी कटाक्षाने पुरुषांपासून गुप्तच ठेवली आहे. ही भाषा त्या बोलत असतात त्यावेळी पुरुषांना त्यामधील एक अक्षरही समजत नाही! पुरुषी वर्चस्वाच्या काळात या भाषेचा जन्म झाला होता. विशेषतः गुलामी आणि महिलांना संधी न देण्याच्या काळात ही भाषा विकसित झाली. चारशे वर्षांपूर्वी मिंग राजवंशाकडून किंग राजवंशाकडे सत्ता हस्तांतरित होण्याच्या काळात या भाषेचा जन्म झाला.
कुटुंबातील पुरुषांच्या वर्चस्वाखालीच जीवन जगणे त्या काळातील स्त्रियांना बाध्य होते. अशा काळात काही बंडखोर महिलांनी एकत्र येऊन ही सांकेतिक भाषा विकसित केली. एका विशिष्ट लिपीच्या माध्यमातून अनेक महिलांनी ही भाषा शिकून घेतली. नुशूच्या माध्यमातून महिलांनी आपल्या आशा, इच्छा, अनुभव एका अनोख्या काव्यात्मक पद्धतीने व्यक्त केल्या. 'नुशू' ही भाषा म्हणजे एक 'फोनेटिक स्क्रिप्ट' आहे. ही लिपी उजवीकडून डावीकडे वाचली जाते. या भाषेने अनेक महिलांना एकत्र आणले व कौटुंबिक-सामाजिक आव्हानांचा सामना करण्यासाठी मदत केली..