उपग्रहांमुळे अंतराळ प्रवास बनेल अवघड | पुढारी

उपग्रहांमुळे अंतराळ प्रवास बनेल अवघड

वॉशिंग्टन : सध्या तीन हजारांहून जास्त ‘कृत्रिम उपग्रह’ आपल्या पृथ्वीभोवती चकरा मारत आहेत. असे असतानाच अमेरिकेच्या ‘फेडरल कम्युनिकेशन कमिशन’कडे डझनाहून अधिक कंपन्यांनी सॅटेलाईट लाँच करण्यासाठी परवानगी मागितली आहे. हे वाढते प्रस्ताव पाहून या उपग्रहांमुळे अवकाशात विनाशकारी टकरी तर होणार नाहीत ना? अशी शंका शास्त्रज्ञ व्यक्त करू लागले आहेत.

‘नासा’चे माजी प्रमुख जिम ब्रिडेनस्टाईन यांनी सिनेटच्या वाणिज्य समितीसमोर बोलताना सांगितले की, आम्ही सध्या मोठ-मोठे मल्टी-सॅटेलाईट कॉन्स्टेलेशन युगाची सुरुवात करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. मात्र, जगभरातील देश अंतराळात उपग्रहांमध्ये होणार्‍या संभाव्य टकरी रोखण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत.

ब्रिडेनस्टाईन यांनी पुढे सांगितले की, उपग्रहांमुळे हाेणाऱ्या संभाव्य टकरी रोखल्या नाहीत तर मानवतेसाठी ते अत्यंत घातक ठरणार आहे. असे झाले तर आम्ही अंतराळाशी संपर्क ठेवू शकणार नाही. यामुळे ‘सॅटेलाईट कम्युनिकेशन’ची अखेर होईल. याबरोबरच मानवाला अंतराळात पाठविणेही अवघड बनेल. कारण, कृत्रिम उपग्रह आणि स्पेसक्राफ्ट यांच्यात टक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय अशा संभाव्य घटनांमुळे राष्ट्रीय सुरक्षा, हवामानाचा अंदाज, जलवायू विज्ञान आदींचे मोठे नुकसान होणार आहे.

दरम्यान, अ‍ॅलन मस्क यांच्या स्पेसएक्सने सध्या 1700 हून अधिक उपग्रह अंतराळात पाठविले आहेत. याशिवाय या कंपनीला आपले 42 हजार उपग्रह लवकरच पृथ्वीभोवती फिरताना दिसतील, असा विश्‍वास आहे. याशिवाय अमेझॉनची कुईपर सिस्टम 3326, तर वनवेब 648 उपग्रह सोडण्याच्या तयारीत आहेत. ही संख्या वाढतच चालली आहे.

Back to top button